शिक्षकांची दिवाळी गोड; वेतन, पेन्शन १ तारखेलाच जमा!
By अमित महाबळ | Published: November 1, 2023 07:12 PM2023-11-01T19:12:49+5:302023-11-01T19:13:04+5:30
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने व अर्थ विभागाने १ तारखेलाच शिक्षकांचे वेतन व पेन्शन मिळावे यासाठी सुक्ष्म नियोजन केले होते.
जळगाव : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांची दिवाळी गोड करण्यासाठी नियमित शिक्षकांचे वेतनासह सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन व उपदान तसेच सेवानिवृत्त केंद्रप्रमुख यांचे पेन्शन व उपदान अदा करण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी तालुकास्तरावर निधी वितरीत केला आहे. यामुळे सेवानिवृत्त शिक्षक, नियमित शिक्षकांची दिवाळी गोड होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने व अर्थ विभागाने १ तारखेलाच शिक्षकांचे वेतन व पेन्शन मिळावे यासाठी सुक्ष्म नियोजन केले होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी निर्देशित केल्याप्रमाणे शिक्षण विभागाने पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला आहे. यामुळे शिक्षकांच्या खात्यावर १ नोव्हेंबर रोजीच वेतन तसेच सेवानिवृत्ती विषयक लाभ जमा झाले आहेत. तालुकास्तरावर निधी वितरित झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी एक तारखेलाच वेतन तसेच वेतन विषयक लाभ शिक्षकांच्या खात्यावर जमा झाले आहेत तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असल्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात खात्यावर रक्कम जमा होणार आहे.
एक तारखेला सेवानिवृत्त शिक्षक तसेच शिक्षकांच्या सेवानिवृत्ती विषयक वेतन व वेतनासाठी अनुदान उपलब्ध करून त्यांच्या खात्यावर जमा होण्याकरिता शिक्षण अधिकारी विकास पाटील, मुख्या लेखा व वित्त अधिकारी बाबूलाल पाटील, सर्व गट शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी अशोक तायडे, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच कनिष्ठ लेखा अधिकारी सुरसिंग जाधव, वरिष्ठ सहाय्यक उमेश ठाकरे यांनी परिश्रम घेतले.
अशा रकमा उपलब्ध
सेवानिवृत्त शिक्षकांना सातवा वेतन आयोगाचा पहिला व दुसऱ्या हप्त्यासाठीएकूण ९ कोटी ६९ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. उपदानासाठी १९ कोटी ५८ लाख रुपये तर अंश राशीकरणाकरिता २३ कोटी ६७ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. ५३ केंद्रप्रमुखांच्या वेतनाकरिता ४८ लाख २२ हजार रुपये तर नियमित शिक्षकांच्या वेतनासाठी ४९ कोटी ५६ लाख रुपये व सेवानिवृत्त शिक्षकांसाठी २२ कोटी ६६ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.