पगाराअभावी शिक्षकांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:46 AM2019-02-22T11:46:47+5:302019-02-22T11:47:30+5:30
गेल्या १७ वषार्पासून शिक्षकांना पगार नसल्यामुळे सहा महिन्यापासून शाळेला बऱ्याच शिक्षकांनी दांडी मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़
जळगाव : चोरगाव (ता. धरणगाव) येथील गंगाधर गोविंदा पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्था लाडली संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्या १७ वषार्पासून शिक्षकांना पगार नसल्यामुळे सहा महिन्यापासून शाळेला बºयाच शिक्षकांनी दांडी मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ या प्रकरणाकडे संस्थाचालक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी हे जाणूनबजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे़
चोरगाव येथील माध्यमिक शाळा २००२ पासून सुरु झाली असून अध्यापही शाळेतील शिक्षकांना पगार न दिल्यामुळे शिक्षकही थकले आहेत. शाळेतील शिक्षक गैरहजर असल्याचा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यावर पालकांनी लागलीच शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांना ४ जानेवारी रोजी तक्रार अर्ज दिला होता. यावर काहीच कारवाई न झाल्याने ११ जानेवारी रोजी शिक्षणाधिकारी यांच्यासह तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना देखील तक्रार अर्ज दिला. मात्र, संबंधित संस्थाचालका विरुद्ध काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे या प्रकरणाची शिक्षणाधिकारी यांनी त्वरीत दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़ संस्था चालकाचा मुलगा मुख्याध्यापक असून सध्या तेच हजर असतात. त्यांना हवी तेव्हा शाळा भरवतात आणि हवी तेव्हा सोडतात, असा आरोप करण्यात आला आहे.
संस्थाचालकांनी शिक्षण विभागाशी कुठलाही पत्रव्यवहार केलेला नाही़ या प्रकरणाची दखल घेतली असून गटशिक्षणाधिकारी यांना संस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत़ -देवीदास महाजन,
माध्यमिक शिक्षणाधिकारी