कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांना विमा कवचच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:17 AM2021-04-28T04:17:37+5:302021-04-28T04:17:37+5:30
जळगाव : कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत सेवा संलग्न करण्यात आलेल्या शिक्षकांना विमा सुरक्षेचा लाभ मिळत नसल्यामुळे शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची ...
जळगाव : कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत सेवा संलग्न करण्यात आलेल्या शिक्षकांना विमा सुरक्षेचा लाभ मिळत नसल्यामुळे शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. एवढेच नव्हे तर साधे लसीकरण सुध्दा करण्यात आले नसल्याने शिक्षकांनी नाराजी सुध्दा व्यक्त केली आहे.
मागील वर्षभरापासून आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत इतर कर्मचा-यांप्रमाणे शिक्षकांच्या सेवा सुध्दा कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत संलग्न करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत काम करणा-या कर्मचा-यांना पन्नास लाख रूपयांचे विमा कवच लागू करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मागील वर्षभरात या मोहिमेत काम करताना मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना पन्नास लाख रूपयांचा विमा कवचचा लाभ देण्यात आला. मात्र, शिक्षकांना विमा संरक्षण कवच मिळालेले नाही. सध्या शहरात २४ शिक्षक कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेतंर्गत सेवा देत आहेत. जिल्हा रूग्णालयात १२ तर शहराच्या काही अंतरावर असलेल्या एका रूग्णालयात १२ असे एकूण २४ शिक्षक कार्यरत आहे. दरम्यान, आरोग्य सेवेचे कुठलेही प्रशिक्षण नसताना रूग्णालयांमध्ये ड्युटी देण्यात आली असल्यामुळे भीतीयुक्त वातावरणात काम करावे लागत असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली. तसेच या शिक्षकांना लसीकरण सुध्दा करण्यात आलेले नाही. वर्षभरामध्ये सुमारे पन्नास शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. विमा संरक्षण नसल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांना लाभ मिळाला नाही. सध्या कोरोनाचा कहर वाढला आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या तर वाढते आहे, मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जे शिक्षक कोरोना रोखण्यासाठी सेवा देत आहेत, त्यांना विमा संरक्षण कवच देण्यात यावे, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
==============
नियुक्ती पत्र मिळताच, दुस-या दिवशी रूग्णालयात आपण हजर झालो. बेड मॅनेजमेंट, रूग्णाची माहिती नातेवाईकांना देणे आदी काम सोपविण्यात आले होते. दरम्यान, आम्हाला ना विमा संरक्षण मिळाले ना लसीकरण. प्रशिक्षण नसल्यामुळे भीती होती, पण, आपले कार्य पूर्णपणे पार पाडले. शासनाने शिक्षकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- पंकज अंभोरे, शिक्षक
==============
रेल्वेस्थानकावर तपासणी करणे, कुटूंब सर्व्हेक्षण करणे आदी कामे शिक्षकांना दिली आहेत. काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाला सर्व्हेक्षण करीत असताना कोरोनाचा लागण झाली व काही दिवसात शिक्षकाचा मृत्यू झाला. शासनाने आता तरी शिक्षकांकडे लक्ष देण्याची गरज आहे. लसीकरण सुध्दा शिक्षकांचे झालेले नाही. त्यामुळे पन्नास लाखाचे विमा संरक्षण त्वरित देण्यात यावे.
- कमलेश श्यामकुवर, शिक्षक
==============
जिल्हा रूग्णालयात वीस दिवस ड्युटी केली. कुठल्याही प्रकारचे पूर्व प्रशिक्षण नव्हते. कोरोना वार्डांना भेट देणे, बेड मॅनेजमेंट, बेड किती उपलब्ध आहेत, आदी जबाबदारी सोपविली होती. पीपीई किट न दिल्यामुळे मास्क घालूनचं वार्डात जावे लागत होते. एका शिक्षक पॉझिटिव्ह आढळले. या काळात हा प्रसंग आमच्यावरही आला असता. त्यामुळे शासनाने शिक्षकांचा विचार करावा व त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने साहित्य पुरवावे आणि विमा संरक्षण द्यावे.
- राजेंद्र आंबटकर, शिक्षक
==============
माझे कुटूंब-माझी जबाबदारी मोहिम २ मेपर्यंत
माझे कुटूंब-माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत घरोघरी जावून कुटूंबाचे सर्वेक्षण केल्यामुळे व बाधित रूग्णांचे विलगीकरण केल्यामुळे पहिल्या टप्प्यातील साथ आटोक्यात आणण्यात मदत झाली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात २८ एप्रिल ते २ मे या कालावधीत माझी कुटूंब माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
============
-रूग्णालयात सेवा देत असलेले शिक्षक : २४
-शिक्षकांचे मृत्यू : ५० (सुमारे)