मुक्ताईनगरच्या शिक्षकाची आग्रा ते दिल्ली धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:36 PM2018-04-30T16:36:01+5:302018-04-30T16:36:01+5:30
२३० किमी धावले : जुन्या पेन्शन योजनेसाठी रामलीला मैदानावर मोर्चा
आॅनलाईन लोकमत
गोंडगाव, ता. भडगाव, दि.३० : राज्य शासनाने सन २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व राज्य कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद केली आहे. पेन्शन पूर्वीप्रमाणे सुरू करावी या मागणीसाठी सोमवार, ३० रोजी दिल्ली येथील रामलीला मैदान येथे शासकीय कर्मचारांच्या भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी मुक्ताईनगर येथील प्राथमिक शिक्षक प्रदीप सोनटक्के आग्रा ते दिल्ली २३० किमी अंतर धावत जाऊन आंदोलनस्थळी पोहचणार आहे.
अन्यायकारक नवीन पेन्शन योजना रद्द करून हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी गेल्या तीन वर्षांपासून जुनी पेन्शन हक्क संघटना कार्य करीत आहे. सोमवार, ३० एप्रिल रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर कर्मचारी आंदोलन करणार आहे. त्यासाठी परभणी येथील भूमिपुत्र व मुक्ताईनगर येथे शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असलेले प्रदीप सोनटक्के हे आग्रा ते दिल्ली हे २३० कि.मी. अंतर धावत जाऊन आंदोलनस्थळी पोहचणार आहे. त्यांच्या या अनोख्या अभियानाची सुरुवात २६ एप्रिल पासून आग्रा येथून झाली आहे. दररोज ते साधारणपणे ५० कि.मी. अंतर पार करत आहे. उन्हातही त्यांचे हे अभियान सुरूच आहे.
जे कर्मचारी मृत पावले आहेत, त्यांच्या कुटुंबाला पेन्शन नसल्यामुळे त्यांना पुढचे जीवन खूपच वाईट परिस्थितीत काढावे लागते. पेन्शन म्हणजे वृद्धापकाळाचा आधार आहे. तो आधार आम्हाला मिळायलाच पाहिजे.
-प्रदीप सोनटक्के, शिक्षक, मुक्ताईनगर