शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी दोन महिन्यांपासून वेतनाविना!
By अमित महाबळ | Published: May 15, 2023 11:55 PM2023-05-15T23:55:40+5:302023-05-15T23:55:57+5:30
अमित महाबळ, जळगाव: जिल्ह्यातील नगरपालिका संचालित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. मार्च व एप्रिल ...
अमित महाबळ, जळगाव: जिल्ह्यातील नगरपालिका संचालित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. मार्च व एप्रिल २०२३ चे वेतन अद्यापही त्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे संबंधित शिक्षकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे.
नगरपालिका संचालित डी. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (भुसावळ), म्युन्सिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (फैजपूर), न. पा. संचालित आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय (सावदा), नगरपालिका संचालित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (यावल) या चारही कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दोन महिन्यांच्या वेतनाअभावी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. चारही महाविद्यालयात मिळून ९० पेक्षा अधिक शिक्षक आहेत. दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने घरातील आजारपण, गृहकर्जाचे हप्ते, विमा हप्ते यासाठी तजवीज करताना शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रसंगी आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
हा दुजाभाव कशासाठी ?
जिल्ह्यातील इतर खाजगी संस्थांमधील शिक्षकांचे वेतन नियमित होत असताना केवळ नगरपालिका संचालित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या बाबतच दुजाभाव का अशी भावना शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहे.
गरजेपेक्षा येणारा निधी कमी
भुसावळ, फैजपूर, सावदा, यावल नगरपालिका संचालित चार उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे दरमहा वेतन करण्यासाठी ३४ लाख रुपये लागतात. प्रत्यक्षात दरमहा १० लाख रुपये मिळत आहेत. ही रक्कम पुरेशी नाही. आतापर्यंत ३० लाख रुपये जमा झाले असले तरीही त्यातून एका महिन्याचे देखील वेतन होणे शक्य नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
अधिकारी म्हणतात...
अनुदानाअभावी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहे. शासनाकडे मागणी केली आहे. त्याची पूर्तता होताच वेतन अदा केले जाईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे वेतन पथक अधीक्षक आर. एच. शर्मा यांनी दिली.