व्यवसाय प्रशिक्षण संस्थांच्या समायोजनास शिक्षकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:31 AM2018-04-28T11:31:07+5:302018-04-28T11:31:07+5:30
जळगावात निवेदन
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २८ - केंद्र शासन कौशल्य विकासावर भर देत असताना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागातंर्गत सुरू असलेल्या राज्यातील सुमारे दोन हजार व्यवसाय प्रशिक्षण संस्था (एमसीव्हीसी, एचएससी, व्होकोशनल) यांचे समायोजन शासकिय आयटीआयमध्ये करण्याचा घाट शासनाकडून सुरू आहे. यास राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण कर्मचारी महासंघाने विरोध केला असून याबाबत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यां शुक्रवारी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की शासकिय आयटीआयमध्ये समायोजन करण्याचा सुरू असलेला घाट यामुळे राज्यातील पंधरा ते वीस हजार शिक्षक व कर्मचा-यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. शिवाय, सदर अभ्यासक्रमाचे रूपांतर आयटीआयमध्ये करत असताना ज्या शिक्षकांनी २५ वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा दिली त्यांना विश्वासात न घेता व जे विद्यार्थी आज शिक्षण घेत आहे, त्यांचा कोणत्याही प्रकारे पाठपुरावा न करता शासन व अधिकारी स्तरावर सदर निर्णय घेतला जात आहे. यामुळे अनेक समस्या व अडचणी निर्माण होणार आहे. उलट शासनाने या अभ्याक्रमास आर्थिक पाठबळ द्यावे, विद्यार्थ्यांना शासकिय सेवेत संधी द्यावी, कुशल कामगार बनविण्यापेक्षा त्यांना कुशल व्यवस्थापक बनवावे. जेणेकरून इंजिनिअर व कुशल कामगार यांच्यातील दरी भरून निघेल आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळतील. याबाबत निर्णय घेण्याची मागणी महासंघातर्फे करण्यात आली आहे.
निवेदन देताना महासंघातर्फे राज्याचे कोषाध्यक्ष प्रा. मनिष बाविस्कर, मेघा जोशी, प्रा. चंद्रशेखर बºहाटे, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. दीपक शुक्ला, शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष आर. एस. सावकारे आदी उपस्थित होते.