शिक्षकाची मुलेही जि. प. शाळेतच
By admin | Published: May 13, 2017 03:59 PM2017-05-13T15:59:19+5:302017-05-13T15:59:19+5:30
विविध कार्यासाठी पुढाकार घेत स्वत: च्या मुलांनाही जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल करून एक आदर्श समाजापुढे उभा केला आहे
ऑनलाइन लोकमत / हितेंद्र काळुंखे
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 13 - चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथील रहिवासी आणि सध्या एरंडोल तालुक्यातील गालापूर येथे जि. प. शाळेत कार्यरत असलेले शिक्षक किशोर रमेश पाटील यांनी जनजागृती, वृक्षारोपण, शैक्षणिक विकास अशा विविध कार्यासाठी पुढाकार घेत स्वत: च्या मुलांनाही जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल करून एक आदर्श समाजापुढे उभा केला आहे.
सध्या जि. प.च्या शाळेचे अनेक शिक्षक आपल्या मुलांना आपल्या स्वत: च्या शाळेचा दर्जा ओळखून इतर खाजगी अथवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकताना दिसतात मात्र किशोर पाटील हे यास अपवाद ठरले आहे. गेल्या 16 वर्षापासून ते जि. प. शाळेत शिक्षक म्हणून आहे. गेल्या वर्षार्पयत ते एरंडोल तालुक्यातील तळई येथे होते. याच शाळेत त्यांचा मुलगा क्षितीज हा पहिली ते चौथी र्पयत शिकला. या शाळेत त्यांनी सेमी इंग्लिश मीडियमची सुरुवात केली आहे. राज्यात सर्वप्रथम हीच शाळा पहिली सेमी इंग्लिश ठरली. या वर्षी त्यांची बदली गालापूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत भिल्ल वस्ती जि. प. शाळेत झाली असून त्यांची मुलगी प्रांजल हीदेखील दुसरीत याच शाळेत शिक्षण घेत आहे.
समितीत क्रियाशील सदस्य
मुलांची आंघोळ करण्यापासून ते भिल्लवस्ती शाळेला आयएसओ करणेर्पयतचे कार्यही त्यांनी केले आहे. पटसंख्या वाढवून अनेक उपक्रम व प्रयोग राबवून त्यांनी राज्यातील कृतीशील शिक्षकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र या राज्याच्या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठीत झालेल्या टास्कफोर्सवरील समितीत क्रियाशील सदस्य म्हणून नुकतीच त्यांची निवड झाली आहे.
जनजागृतीचे काम
बेटी बचाओ-बेटी पढावो, शौचालयाचा वापर करा, मुलांना जि.प.शाळेत दाखल करा आदी संदेश बैलपोळ्याच्या दिवशी बैलांच्या अंगावर ते रंगवतात. हा जनजागृतीचा उपक्रम गत 10 वर्षापासून ते राबवत आहे. एवढेच नाही तर शाळा आवारातही त्यांनी अनेक झाडे लावून ती वाढविण्यासाठी परिश्रम घेतली.
कुंझर शाळेला बांधून दिले प्रवेशद्वार
पाटील यांचे मूळ गाव कुंझर हे चाळीसगाव तालुक्यात डोंगरद:यात वसले आहे. या छोटय़ाशा गावात किशोर पाटील यांनी त्यांचे वडील व आदर्श शिक्षक स्व.रमेश सहादू पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुंझर जि.प. शाळेला प्रवेशद्वार बांधून दिले आहे. वडिलांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त 9 अनाथांना त्यांनी शैक्षणिक साहित्यही स्वखर्चाने दिले. असे विविध उपक्रम त्यांनी राबविले असून पुढेही अशीच कामे करण्याचा त्यांचा मानस आहे.
12 वीमध्ये विज्ञान शाखेत ‘क्रॉप प्रॉडक्शन’ विषयात 100 पैकी 99 गुण होते. बीएससी अॅग्रीला सहज संधी मिळणार होती मात्र वडिलांच्या प्रभावानुसार समाज घडविण्याच्या दृष्टीने शिक्षक बनण्याचा निर्धार केला. जि.प. शाळा टिकवण्यासाठी व स्वत:च्या पाल्यांना जि.प. शाळेतच दाखल केले. यामुळे इतर पाल्यांचाही शाळेकडे पाहण्याचा दृष्टीकोन निश्चितच बदलतो. एखाद्या शिक्षकाची मुले त्याच्याच शाळेत असली तर शैक्षणिक दर्जाकडे सहाजिकच त्याचे अधिक लक्ष राहील, असे मला वाटते.
- किशोर पाटील