विद्यार्थी प्रवेशासाठी शिक्षकांची चढाओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:21 AM2021-08-12T04:21:00+5:302021-08-12T04:21:00+5:30
काही शिक्षक अकरावी असो, आठवी किंवा पाचवीचे प्रवेश असो, तब्बल परस्पर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचा दाखला काढून घेण्यासाठी तत्पर असतात. ...
काही शिक्षक अकरावी असो, आठवी किंवा पाचवीचे प्रवेश असो, तब्बल परस्पर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचा दाखला काढून घेण्यासाठी तत्पर असतात. या वेगवेगळ्या शालेय प्रवेशाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील पालकवर्ग संभ्रमात असतो की, नेमके माझ्या मुला-मुलीचे ॲडमिशन कोणत्या शाळेत घ्यावे, यामुळे विद्यार्थ्यांचे वैचारिक स्वातंत्र्य हिरावत आहे. या शिक्षकांच्या स्पर्धेत मुलेही गोंधळात पडत आहेत. नेमके एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या इच्छेने शाळा प्रवेश घ्यायचा असतो, परंतु त्या ठिकाणी हे शिक्षकवर्ग घरी जाऊन पालकांचे समुपदेशन करतात की, आमच्याकडे अशा सोयी आहेत, तशा सोयी आहेत, अशामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता अवस्था संभ्रमित होत आहे.
सध्या तरी प्रत्येक शाळेतील शिक्षक विद्यार्थी प्रवेश निर्धारित संख्या, शाळा व शिक्षक नोकरी वाचविण्यासाठी दारोदारी प्रवेशासाठी फिरत आहेत. या कारणाने दोन-चार दिवसांपूर्वी कुऱ्हाड येथे विद्यार्थ्यांचे दाखले देण्याहून शिक्षकांमध्ये वाद निर्माण झाला होता. शिक्षकवर्ग जरी आपली विद्यार्थी प्रवेशसंख्या पूर्ण करण्यासाठी धडपड करीत असला, तरी शिक्षकांच्या स्पर्धात्मक प्रवेशासारख्या बाबी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर नको, असा सूर पालकवर्गातून निघत आहे.