कुणी शिक्षक देता का शिक्षक, झेंडावंदन होताच ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 01:27 PM2018-08-15T13:27:19+5:302018-08-15T13:28:04+5:30
चिंचोली पिंप्री, ता. जामनेर येथे जि.प.च्या प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन केल्यानंतर कुलूप ठोकले. येथील शाळेत पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्गात
जामनेर (जळगाव) - चिंचोली पिंप्री, ता. जामनेर येथे जि.प.च्या प्राथमिक शाळेला संतप्त ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन केल्यानंतर कुलूप ठोकले. येथील शाळेत पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्गात 121 विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेसाठी पाच शिक्षकांची नियुक्ती आहे. मात्र, सध्या शाळेत तीन जागा रिक्त आहेत. हजर असलेल्या दोन शिक्षकांपैकी एक पँरिलीसीसने ग्रस्त असून त्यांना बोलताही येत नाही, ते विद्यार्थ्यांना कसे शिकवणार असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
ग्रामस्थांकडून शिक्षक मिळावा अशी मागणी करण्यात आल्यानंतर दोघांची तात्पुरती नियुक्ती केली गेली. यातील महिला शिक्षिका रुजू होवून बाळंतपणाच्या रजेवर गेल्या तर दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती ऑनलाईन बदली प्रक्रीयेत अडकली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळा डिजिटल करण्यात आली. पंचायत समितीतील शिक्षण विभागाकडे दीड महिन्यापूर्वीच मागणी केली, मात्र शिक्षकच मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांना टोकाचे पाऊल उचलावे लागले. याकडे लक्ष वेधण्यासाठी पालक पं.स.च्या शिक्षण विभागास कुलूप ठोकले. दरम्यान, पं.स.चा शिक्षण विभाग आमच्या गावास वेठीस धरले जात आहे. कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत जास्त शिक्षक देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आमच्यावरील अन्याय दुर करावा, असी मागणी गावचे सरपंच विनोद चौधरी यांनी केली आहे.