तंत्रज्ञान व नवनिर्मितीनेच देशाचा विकास शक्य
By admin | Published: April 8, 2017 05:57 PM2017-04-08T17:57:59+5:302017-04-08T17:57:59+5:30
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 25 व्या पदवीप्रदान समारंभ सोहळ्याचे आयोजन शनिवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात करण्यात आले होते.
डॉ.ज्येष्ठराज जोशी यांचे प्रतिपादन : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 25 वा दीक्षांत समारंभ; दीक्षांत मिरवणुकीने वेधले लक्ष; 32 हजार 161 स्नातकांना पदवी प्रदान
जळगाव : भारतात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र या संधी उपलब्ध करण्यात आपण अपयशी ठरत आहोत. त्यामुळे भारतात विविध समस्या निर्माण होत आहेत. विज्ञान ही एक जीवनदृष्टी असून समाजात ती रुजली तर त्यातून तंत्रज्ञानाची निर्मिती होऊन समाजामध्ये मोठी संपत्ती निर्माण होऊ शकते. भारताचा विकास जर साधायचा असेल तर तंत्रज्ञान व नवनिर्मितीशिवाय शक्य नाही, असे प्रतिपादन मुंबईच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक पद्मभूषण डॉ.ज्येष्ठराज जोशी यांनी व्यक्त केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 25 व्या पदवीप्रदान समारंभ सोहळ्याचे आयोजन शनिवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील हे होते. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.ए.बी.चौधरी, वाचन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे डॉ.डी.एन.गुजराथी, व्यवस्थापन परिषद सदस्य व उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.केशव तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.
घनकच:यातून पेट्रोलनिर्मिती शक्य
डॉ.जोशी यांनी सांगितले की, शेतीतील घनकचरा वापरून पेट्रोजन्य पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान निर्माण करायला हवे. कारण सध्याचे पेट्रोल-डिङोलचे साठे संपत चालले आहे. कोळसा देखील संपला आहे. भारतात 80 लक्ष टन घनकचरा आहे. त्यातून 24 टन खनीज तेल तयार करता येऊ शकते. भारत 20 कोटी टन खनीज तेल आयात करते. त्यापेक्षा अधिक खनीज तेलाची निर्मिती घनकच:यापासून करू शकतो. हा कचरा नसून संपत्ती असल्याचे ते म्हणाले. देशाच्या मिळकती पैकी 10 टक्के पैसा आपण तेल घ्यायला वापरतो. तेल व डाळी आपल्याला विकत आणाव्या लागतात. तेव्हा पीकवृध्दी गरजेची आहे आयात पूर्ण थांबवायची असेल तर 50 टक्कयाने क्षेत्र वाढवावे लागेल असेही डॉ.जोशी म्हणाले.
विज्ञान केवळ शाळा, महाविद्यायात शिकविण्याचा विषय नाही
डॉ.जोशी म्हणाले की, आपला समाज विज्ञाधिष्ठित नाही. विज्ञान हा फक्त शाळा, महाविद्यालयात शिकण्याचा विषय नाही. समाजात विज्ञान रुजण्याची गरज आहे. त्यातून तंत्रज्ञानाची निर्मिती होऊन संपत्ती निर्माण होऊ शकते. आपण केवळ तंत्रज्ञान आयात करीत आहोत. विज्ञान व तंत्रज्ञान निर्मितीमध्ये आपण मागे पडत आहोत असे सांगताना डॉ.जोशी यांनी विविध माध्यमातून देशाची प्रगती कशी होऊ शकते या बद्दल उदाहरणाव्दारे माहिती दिली.
जगाला पुरेल एवढी वीज निर्माण करण्याची क्षमता
सौरऊर्जेतून सध्या 2 ते 3 पध्दतीने ऊर्जा तयार केली जाते. प्रकाश विद्युताची कार्यक्षमता नवीन संशोधनाने 40 टक्कयांर्पयत नेता येईल. सौरऊर्जेचे रुपांतर बायोमासमध्ये करण्याची क्षमता 3 टक्कयांर्पयत वाढविली तर त्यासाठी 15 टक्के जमीन जास्त लागेल. ज्या जमीनीत काहीही पिकत नाही अशी 16 ते 20 टक्के जमीन भारतात आहे. अशा जमीनीमध्ये 15 टक्के कार्यक्षमतेचे आणि योग्य किमतीमध्ये ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभे केले तर सर्व जगाला पुरेल एवढी वीज आपण तयार करु, असा विश्वासही डॉ.जोशी यांनी व्यक्त केला.
राजकारण्यांची समज कुलगुरूंपेक्षा अधिक
डॉ.जोशी म्हणाले की, भारतीय लोकांना एकमेकांवर टीका करण्याची सवय झाली आहे. देशाचा विकास होत नाही, म्हणून प्रत्येकजण राजकारण्यांना दोष देतो. मात्र अनेक राजकारण्यांशी चर्चा करताना आढळले की, त्यांची शैक्षणिक समज ही अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंपेक्षादेखील अधिक असल्याचे डॉ.जोशी यांनी सांगितले. तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी माणसाने कधीही तक्रार न करता आपल्या कार्यावर लक्ष दिले पाहिजे असे डॉ.जोशी म्हणाले.
मुंबई, पुण्यापेक्षाही उमवित मुलींची गुणवत्ता अधिक
पदवी प्रदान समारंभाच्यावेळी वितरित करण्यात आलेल्या 79 सुवर्णपदकांपैकी 63 टक्के मुली सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. याबाबत बोलताना डॉ.जोशी म्हणाले की, अनेक विद्यापीठांच्या पदवी प्रदान समारंभाच्या कार्यक्रमांना मी हजेरी लावली आहे. मात्र मुलींच्या गुणवत्तेचे प्रमाण उमवि इतके मुंबई, पुण्यातदेखील नाही.
तेव्हा कळण्याची भाकर व वांग्याचे भरीतचा आस्वाद घेतो..
जळगावची खाद्य संस्कृती देखील उत्तम असून जेव्हाही काही नवनिर्मिती करण्याची इच्छा असते, तेव्हा कळण्याची भाकर व वांग्याचे भरीत खात असल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.
शहादा, नंदुरबार, धुळे,फैजपूर व चाळीसगाव येथे विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु करणार
आपल्या अध्यक्षीय भाषणात उमविचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी गेल्या वर्षभरात विद्यापीठाकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच भविष्यात विद्यापीठाकडून विद्यार्थी हाच केंद्रबिंदू ठेवून उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यापीठाकडून राबविण्यात येणार असल्याचे प्रा.पी.पी.पाटील यांनी सांगितले. तसेच धुळे, नंदुरबार या ठिकाणी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यात येणार असून, शहादा,नंदुरबार, धुळे, फैजपूर आणि चाळीसगाव या पाच ठिकाणी विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचेही कुलगुरुंनी सांगितले.
दीक्षांत मिरवणुकीने वेधले लक्ष
या कार्यक्रमात दीक्षांत मिरवणुकीने सभामंडपात अतिथीचे आगमन झाले. मानदंड घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी सहायक कुलसचिव डॉ.आर.पी.पाटील हे होते. मिरवणुकीत प्रमुख अतिथींसह अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य हे सहभागी झाले होते. कुलगुरू व प्रमुख अतिथींसह सर्वानी डोक्यात गांधी टोपी परिधान केली होती. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रा.संजय पत्की व सहका:यांनी गीत सादर केले. विविध विद्याशाखांच्या अधिष्ठातांनी स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. अधिष्ठातांमध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.पी.टी.चौधरी, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य बी.एन.पाटील आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.अरविंद जोशी यांचा समावेश होता.
विद्याथ्र्याची सहपरिवार उपस्थिती
पदवीप्रदान समारंभात एकूण 32 हजार 161 स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या. तसेच विविध विद्याशाखेत प्रथम आलेल्या 79 सुवर्णपदक व 128 पीएच.डी.धारकांना पदवी प्रदान करण्यात आली. विद्याथ्र्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असल्याने या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी विद्यार्थी आपल्या परिवारातील सदस्यांसोबत या ठिकाणी उपस्थित होते. तर अनेक विद्यार्थी सुवर्णपदक मिळाल्यानंतर तो क्षण सेल्फीव्दारे आपल्या मोबाईलमध्ये टिपताना दिसले. तर काही विद्यार्थी यावेळी भावूकदेखील झाले होते.
जया अग्रवाल हिला तीन सुवर्णपदक
पदवीप्रदान समारंभात केसीई सोसायटीच्या एस.एस.मणियार विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी जया मांगीलाल अग्रवाल हिला एल.एल.बी.अभ्यासक्रम परीक्षेत विद्यापीठात प्रथम, तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यापीठात प्रथम व तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या ‘सिव्हील कोड लिमीटेशन अॅक्ट’ या विषयात तीन विद्यापीठात प्रथम आल्याने तीन वेगवेगळ्या सुवर्णपदकाची मानकरी ठरली. सुवर्णपदक प्रदान प्रसंगी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
माजी कुलगुरूंची अनुपस्थिती
पदवी प्रदान सोहळ्यासाठी विद्यापीठाकडून माजी कुलगुरूंना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र एकाही माजी कुलगुरूंनी यावेळी हजेरी लावली नाही. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनादेखील निमंत्रण देण्यात आले होते, मात्र जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या व्यतिरिक्त इतर लोकप्रतिनीधींनी पाठ फिरविली. केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे तसेच माजी आमदार शिरीष चौधरी हे देखील उपस्थित होते.