सरकार सांगा जगायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:16 AM2021-04-02T04:16:13+5:302021-04-02T04:16:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात मंगल कार्यालयांमध्ये लग्न करण्यास बंदी घालण्यात आली आहे. १५ एप्रिलपर्यंत सर्व लग्न सोहळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात मंगल कार्यालयांमध्ये लग्न करण्यास बंदी घालण्यात आली आहे. १५ एप्रिलपर्यंत सर्व लग्न सोहळे हे घरातच २० लोकांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. मात्र, त्यामुळे संपूर्ण महिन्यात मंडप, टेन्ट हाऊस, डेकोरेटर्स आणि मंगल कार्यालय, लॉन्स यांना यावर्षीदेखील कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाले. त्यावेळी मंगल कार्यालय आणि मंडप व्यावसायिकांचा संपूर्ण वर्षाचा होणारा व्यवसाय बुडाला. हीच वेळ आता पुन्हा एकदा आली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच वर्षभर व्यवसाय नाही म्हणून तोट्यात गेलेल्या या व्यवसायाला अडचणीचा सामना करावा लागत आहे.
मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये लग्न कार्य मोठ्या प्रमाणात उरकली जातात. त्याच काळात कडक निर्बंध आल्याने हा व्यवसायदेखील ठप्प झाला आहे.
ॲडव्हान्सदेखील परत करण्याची वेळ
मार्च ते जून या काळात लग्न कार्य होतात. लग्नाची तारीख ठरल्यानंतर वधू-पिता लग्नासाठी मंगल कार्यालय, लॉनस्, मंडप सगळे बुक करतात. यंदा डिसेंबरपासून निर्बंध कमी झाले होते. त्यामुळे अनेकांनी लग्नासाठी ॲडव्हान्स देऊन ठेवला होता. आता निर्बंध आल्याने ग्राहकांकडून मिळालेला ॲडव्हान्स परत करण्याची वेळ या मंगल कार्यालय- मंडप मालकांवर आली आहे.
...तर हॉटेलचीही परवानगी रद्द करा
ज्या ठिकाणी हॉटेलच्या नावाखाली लग्न सोहळे आणि इतर कार्यक्रम होत आहेत. त्या हॉटेल्सचीही परवानगी रद्द करण्याची मागणी प्रदीप श्रीश्रीमाळ यांनी केली आहे. अनेक जण लपून छपून कार्यक्रम करतात आणि त्याची शिक्षा मात्र आम्हाला भोगावी लागते. त्यामुळे यापुढे कोणत्याही हॉटेलमध्ये जर असे कार्यक्रम केले जात असतील, त्यांच्यावर थेट परवानगी रद्द करण्याची कारवाई करावी, असेही श्रीश्रीमाळ यांनी सांगितले.
कोट - गेल्या वर्षभरात मंगल कार्यालय आणि मंडप भाड्याने देण्याच्या व्यवसायाला मोठा तोटा झाला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा कडक निर्बंध घातले आहेत आणि ऐन लग्नाच्या तिथींमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागत आहेत. आम्हाला व्यवसाय करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी - प्रदीप श्रीश्रीमाळ, अध्यक्ष, मंडप डेकोरेटर्स असोसिएशन.
आकडेवारी
शहरात टेन्ट हाऊस मालक - २००
वार्षिक उलाढाल मार्च २०२० च्या आधी - सुमारे चार कोटी
मार्च २०२१ - शून्य
मार्च ते मेचा ॲडव्हान्स परत - सुमारे ६० लाख
व्यवसायावर चरितार्थ अवलंबून असलेले - दहा हजार
-----
शहरातील मंगल कार्यालये व लॉन्स - ६५
वार्षिक उलाढाल -
मार्च २०२० च्या आधी - २० कोटी
मार्च २०२१ - शून्य