सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:09+5:302021-07-07T04:19:09+5:30

जुलै उजाडला तरी पावसाची प्रतीक्षा : पेरण्या खोळंबल्या (डमी ८८२) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - हवामान खात्याने यावर्षी जिल्ह्यात ...

Tell me, Bholanath, will it rain? | सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?

Next

जुलै उजाडला तरी पावसाची प्रतीक्षा : पेरण्या खोळंबल्या

(डमी ८८२)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - हवामान खात्याने यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षादेखील अधिक पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. मात्र, जुलैपर्यंत तरी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरताना दिसून येत नाही. कारण जुलै महिना उजाळला असतानादेखील पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. त्यात जिल्ह्यात ३० टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी पावसाअभावी निम्मे क्षेत्रावर आता दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

जून महिन्यात जरी मान्सूनचे आगमन वेळेवर झाले असले तरी जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, धरणगाव या तालुक्यांमध्ये जून महिन्याचा सरासरीच्या केवळ ५० टक्केच पाऊस झाला आहे. तर इतर ठिकाणी देखील अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्हाभरात पेरण्या खोळंबल्या आहेत. सद्य:स्थितीत केवळ ३० टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यातही २० टक्के क्षेत्र हे बागायती कापसाचे आहे. तर उर्वरित १० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू जमिनीवरचे आहे. ज्या भागात सोयाबीनची पेरणी लवकर झाली होती. अशा भागात सोयाबीनचे पीक पूर्णपणे जळून गेले आहे. काही शेतकऱ्यांनी इतरांकडून पाणी घेऊन पिके जगवण्याचा प्रयत्न केला असला तरी अनेक शेतकऱ्यांना यावर्षी दुबार पेरणी करावी लागणार आहे. उडीद व मूग अजूनही तग धरून असले तरी येत्या तीन-चार दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास उडीद-मूग लागवड केलेल्या शेतकऱ्यांवरदेखील दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.

तर दुबार पेरणी अटळ

जिल्ह्यात २५ जूननंतर समाधानकारक म्हणता येईल असाही पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात जून महिन्याचा सरासरीपेक्षाही १५ टक्के कमी पाऊस झाला आहे. लवकर पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. सद्य:स्थितीत मान्सूनला ब्रेक लागला आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार १० जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, १० जुलैनंतर पाऊस सक्रिय न झाल्यास जिल्ह्यातील खरीप हंगाम लांबून, दुबार पेरणीचे संकट अधिक गडद होणार आहे.

बाजरीचा पेरा वाढणार

जिल्ह्यात दरवर्षी १५ हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरीची लागवड होत असते, मात्र यावर्षी सोयाबीन, मूग व उडीद या पिकांना कमी झालेल्या पावसामुळे फटका बसणार असल्याने जिल्ह्यात यंदा बाजरीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाकडून यंदा २०० क्विंटल बाजरीचे बियाणे वाटप करण्यात आले आहे. कमी कालावधीत येणारे पीक असून, चाऱ्यासाठीदेखील याचा वापर होतो. दरम्यान, सोयाबीनच्या क्षेत्रात मात्र घट होण्याची शक्यता आहे.

चोपडा, अमळनेर तालुक्यात कमी पाऊस

जिल्ह्यात यंदा जून महिन्यात सरासरीच्या १५ टक्के पाऊस कमी झाला आहे. रावेर, यावलसह पाचोरा, तालुक्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला असला तरी चोपडा, अमळनेर व धरणगाव तालुक्यात यावर्षी जून महिन्याचा एकूण सरासरीपेक्षा तब्बल ५० टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यात ३० जूनपर्यंत केवळ १२ ते १५ टक्केच पाऊस झाला आहे. तसेच पाऊस लांबला तर पेरण्यादेखील लांबतील, त्यामुळे खरीप हंगामाच्या उत्पादनावरदेखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोट...

जिल्ह्यात काही ठरावीक तालुके वगळता इतर तालुक्यांमध्ये बरा पाऊस झाला होता. मात्र, जुलै महिन्यात पावसाचा खंड पडल्याने काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून, पाऊस लांबल्यास झालेल्या पेरण्याही वाया जाण्याची भीती आहे. कृषी विभागाकडून दुबार पेरणीसाठीदेखील बियाणे उपलब्ध आहे. मात्र, ती वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, अशी आशा आहे.

-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक,

देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो

गेल्या वर्षी मान्सूनचे वेळेवर आगमन झाले होते. जुलैपर्यंत शेतकऱ्यांना चांगले उत्पादन येईल, अशी आशा होती. मात्र, नंतर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला होता. तर यावर्षी देखील सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. तर अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. आता सर्व निसर्गावर अवलंबून आहे.

-कैलास जाधव, शेतकरी, फुपनगरी

बियाण्यांचे दर वाढलेले असताना, बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, पावसाअभावी पीक पुन्हा वाया गेले आहे. आता पुन्हा बियाणे घ्यावे लागणार आहे. आता जे पण उत्पन्न येईल त्यात झालेले नुकसान भरून निघाले तरी चालेल. मात्र, पुन्हा निसर्गाने पाठ फिरविली तर मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर कोसळणार आहे.

-रमेश पाटील, शेतकरी, निरूळ,

Web Title: Tell me, Bholanath, will it rain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.