सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? पाण्याअभावी पिके संकटात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:18 AM2021-08-15T04:18:56+5:302021-08-15T04:18:56+5:30
स्टार १०४८ विजकुमार सैतवाल जळगाव : गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून दुबार ...
स्टार १०४८
विजकुमार सैतवाल
जळगाव : गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून दुबार पेरणीही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून पेरणीसाठी केलेली हातउसनवारी कशी फेडावी, अशी चिंता बळीराजापुुढे उभी राहिली आहे. यात जलसाठ्यांमध्येही वाढ होत नसल्याने जिल्हाभर चिंतेचे वातावरण आहे.
सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६२ टक्के पाऊस झाला आहे. मात्र धरणगाव, अमळनेर व चोपडा या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा तब्बल ३० टक्के कमी पाऊस आहे. त्यामुळे या तालुक्यांमधील खरीप हंगाम जवळपास पूर्णपणे वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चोपडा, अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता प्रशासनाकडे केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस झाला आहे.
पेरणी वाया जाण्याची शक्यता (खरीप पिकांचा आढावा हेक्टर्समध्ये)
१) कापूस- १००
२) उडीद - १५०
३) मूग - १५०
४) मका - १२५
५) सोयाबीन - २००
पाणीसाठा ३६ टक्क्यांवर
लघु प्रकल्प - ९.९० टक्के
मध्यम प्रकल्प - ४५.१३ टक्के
मोठे प्रकल्प - ४०.२७ टक्के
उसनवारी कशी फेडणार?
शेतकऱ्यांचा नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. पावसाअभावी सोयाबीन, उडीद, मुगाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे, तसेच आगामी काही दिवस पाऊस न झाल्यास उडीद व मुगामधील दाणे तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिके हातची जात असून उसनवारी कशी फेडावी अशी चिंता आहे.
- विठ्ठल पाटील, शेतकरी.
पावसाअभावी पिके संकटात सापडली असून सोयाबीनचे पिक जवळपास नष्ट झाले आहे. कापूस, मका हे पिकदेखील धोक्यात आले असून ती कशी टिकवावी, अशी चिंता आहे. शिवाय जलसाठ्यांमध्येदेखील पाणी वाढत नसल्याने रब्बी हंगामाचादेखील प्रश्न आहे.
- विजय पाटील, शेतकरी.
गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने नुकसान तर होणार आहे. प्रत्येक पिकाचे नुकसान हे जमिनीच्या प्रतवारीवर अवलंबून असते. त्यामुळे एकूण किती नुकसान होऊ शकते, याचा अंदाज आता येणे शक्य नाही.
- संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.