मृत्यू झाला सांगाती...इथून रोज निघतात मृतदेहांच्या वराती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:14 AM2021-03-24T04:14:40+5:302021-03-24T04:14:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सुनील पाटील जळगाव : मृत्यू हा मानवी जीवनातील अंतिम संस्कार. त्यातच पोस्टमार्टम नाव जरी ऐकले तरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सुनील पाटील
जळगाव : मृत्यू हा मानवी जीवनातील अंतिम संस्कार. त्यातच पोस्टमार्टम नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा येतो. सर्वांनाच मृत्यूचे खूप भय, पण त्यापेक्षा जास्त भय असते मृत व्यक्तीच्या शरीराचे. माणूस अकाली मृत्युमुखी पडला किंवा त्याचा अपघाती, घातपाताने मृत्यू झाला किंवा त्याने आत्महत्या केली तर त्या व्यक्तीचे भूत होते, अशा गप्पा आजही अनेकांच्या तोंडून ऐकल्या जातात. पण जिल्हा रुग्णालयातील पवन बाबू जाधव (५०) व अनिल रतनलाल घेंगट (४८) हे कर्मचारी दररोज २४ तास मृत शरीराच्या संपर्कात येतात, शवविच्छेदन करुन ते शरीर नातेवाईकांच्या ताब्यात देतात. वर्षभरात या दोघांनी ९६० जणांचे शवविच्छेदन केले.
सध्या सर्वत्र मृत्यूचे भय आहे. त्यातच मृतदेहांसोबत असणाऱ्या अनिल व पवन या दोघांना ‘लोकमत’ने बोलते केले.
मृतदेह आमचे सांगाती
सर्वसामान्य माणसांसारखेच आम्हीही माणूस आहोत. आम्हाला संसार व वैयक्तिक आयुष्य आहे. मात्र त्याचा आनंद आम्ही आमच्या मनाप्रमाणे कधीच घेऊ शकत नाही. सकाळचा चहा असो की जेवणाच्या ताटावर बसलेले असो, अचानक फोन येतो..‘अपघात झाला आहे, तातडीने मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे आहे’...अर्धवट चहा, जेवण सोडून तातडीने रुग्णालय गाठतो. सण, उत्सव आम्हाला लागू नाही.
वाद, भावना,संताप पडला अंगवळणी
शवविच्छेदनगृहात आलेला मृतदेह हा नक्कीच कोणत्या ना कोणत्या घटनेतील असतो. नैसर्गिक मृत्यूपेक्षा याचे गांभीर्य जरा वेगळे असते. त्यात महिला, तरुण व अल्पवयीन मुलगा, मुलगी असली की नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांचा वाद, भावना, संताप असतो. आम्हीही त्याची जाण ठेवतो. गळफास, रेल्वे अपघात, रस्ता अपघात, विष प्राशन, सर्पदंश, पाण्यात बुडून मरण पावलेल्या व्यक्तींविषयी या भावना अधिक असतात.
बेवारस मृतदेहांचे पोलिसच होतात नातेवाईक
मृतदेह चांगल्या स्थितीत राहण्यासाठी रासायनिक द्रव्यांचा वापर केला जातो. बाहेरुन नवा कोरा कापड आणून त्यात मृतदेह गुंडाळून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. बेवारस मृतदेह असला की तीन दिवस शवागारगृहात ठेवला जातो. त्यानंतर नातेवाईक नाही मिळाले तर पोलीसच बेवारस म्हणून त्याच्यावर नियमानुसार अंत्यसंस्कार करतात.
बॉक्स
लहान मुलाचे शवविच्छेदन करताना हात थरथरले...(फोटो पवन जाधव)
भावना प्रत्येकाला आहेत. रोज अनेक मृतदेहांचे शवविच्छेदन करतो. श्रीमंत व्यक्ती, पुढारी, अधिकारी असो किंवा आणखी कोणी उच्चपदस्थ व्यक्ती असो..नेहमी प्रमाणेच शवविच्छेदन करीत असताना अगदी पाच ते दहा वर्षाच्या मुलांचा मृतदेह जेव्हा शवविच्छेदनगृहात येतो..तेव्हा आमचेही हात थरथरतात असे पवन जाधव यांनी सांगितले..
बॉक्स
कोरोनातही जीव धोक्यात (फोटो अनिल घेंगट)
सध्या वर्षभरापासून कोरोनाचा कहर सुरु आहे. दररोज सरासरी दहापेक्षा अधिक मृतदेह येत असतात. या मृतदेहांचे शवविच्छेदन होत नाही, परंतु, अतिशय चोखपणे मृतदेह किटमध्ये गुंडाळून नातेवाईकांच्या ताब्यात द्यावा लागतो. ज्या आजाराने लोक मरण पावत आहेत, त्याच आजाराच्या मृतदेहांची रोज आम्हालाच काळजी घ्यावी लागत आहे. मरणाची भीती आम्ही बाळगत नाही, असेही अनिल घेंगट यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात शवविच्छेदन
जानेवारी ते डिसेंबर २०२० : ९६०
जानेवारी ते मार्च : २३८
कोविड मृत्यू : १४९०