जिल्ह्यातील कोरोनाच्या उच्चांकी तापमानापुढे 'मे हीट'चे तापमान पडले फिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:54 PM2020-05-17T12:54:11+5:302020-05-17T12:58:32+5:30
जिल्ह्याच्या वाढत्या तापमानाच्या चर्चाना यंदा कोरोनामुळे ब्रेक लागला आहे.
वासुदेव सरोदे
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : जिल्ह्याचे तापमान ४६ डिग्रीच्या जवळपास पोहोचले असताना 'कोरोना'च्या वाढत्या उच्चांकी तापमानामुळे 'मे हीट'ची चर्चा फिकी पडली आहे. शनिवारी ४५.४४ डिग्री तापमानाची नोंद न्हावी येथील कृषी शासकीय कार्यालयावर घेण्यात आलेली होती. मात्र त्यावर कोठेच चर्चा होताना दिसली नाही.
दरवर्षी एप्रिल-मे मध्ये जिल्ह्यातील तापमानाची राज्यातच नव्हे तर देशात चर्चा होत असे व एकप्रकारे या उष्ण तापमानाची दहशत होती. मात्र यंदा कोरोना महामारीमुळे या तापमानाच्या चर्चांना एकप्रकारे ब्रेकच लागलेला आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या अडीचशेच्या जवळपास आहे व दररोज ही संख्या वाढतच आहे. मुंबई-पुणे मालेगाव नंतर जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे एरवी दरवर्षी जिल्ह्याच्या तापमानाबद्दल राज्यातच नव्हे तर देशात चर्चा होत असे.
दरवर्षी प्रत्येक उन्हाळ्यात जिल्ह्याचे तापमान ४५- ४६ नव्हे तर ४८ डिग्रीपर्यंत जात असल्याने एकप्रकारे रस्त्यावर संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होत असे.
त्यातच एप्रिल-मे मध्ये असलेली लगीनघाई, अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा, ए सी, कुलरची मोठ्या प्रमाणात होणारी विक्री, आईस्क्रीम, कुल्फी व रसवंतीवर होणारी आबालवृद्धांची गर्दी, सुट्टीच्या काळात मामाच्या गावाला जाऊया याची असलेली धूम हे सर्व आता यंदा दुर्लभ झाले आहे.
या वर्षीसुद्धा दररोज तापमान ४५/४६ डिग्रीवर जात आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या उच्चांकी तापमानाने सूर्यदेवाच्या या तापमानाला फिके केले असून, त्याची चर्चासुद्धा नाही हे प्रथमच मिळत आहे.
चर्चा आहे केवळ कोरोना कोरोना व कोरोनाचीच.