तीनशे पन्नास वर्षांपासून मंदिराला रस्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:13 AM2021-06-28T04:13:37+5:302021-06-28T04:13:37+5:30
धरणगाव : धरणगाव शहरात असलेले मंदिर प्राचीन काळातील असून त्या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७२ साली भेट ...
धरणगाव : धरणगाव शहरात असलेले मंदिर प्राचीन काळातील असून त्या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७२ साली भेट देऊन काही वेळ ते या ठिकाणी थांबले होते. हे मंदिर नगरपालिका हद्दीत असून इसवी सन १६३० मध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या हस्ते या मंदिराची स्थापना करण्यात आली.
मंदिर साडेश्वर शिवमंदिर म्हणून धरणगाव तालुक्यात प्रसिद्ध आहे. भक्त त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मात्र रस्ताच नसल्याने पावसाळ्यात त्या ठिकाणी भक्त जाऊ शकत नाही.
तीनशे पन्नास वर्षांपूर्वीचा रस्ता दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी भक्तांकडून होत आहे. धरणगाव शहरात रस्त्यांची कामे जोरात सुरू असून मंदिरात जाण्यासाठी रस्ता तयार केला जात नाही. हा रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र तहसीलदारांना दिले होते. या ठिकाणी काही वर्षांपूर्वी रस्त्याचे मोजमाप केले आहे. मात्र तेसुद्धा धूळ खात पडलेले दिसून येते.
वारंवार या रस्त्यासाठी अर्जदार नगरपालिका प्रशासन, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रांत यांच्याकडे मागणी करत असून मात्र याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.
सध्याची परिस्थिती पाहता त्या ठिकाणी मंदिरात जाण्यासाठी रस्ता नसल्याने तीच संधी साधून आजूबाजूला ग्रामस्थ शौचास बसत असतात. त्यामुळे मंदिराची विटंबना होत असून भक्तांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
या रस्त्यासंदर्भात पूर्णपणे माहिती घेऊन नगरपालिकेला रस्ता तयार करण्याचे आदेश देण्यात येतील.
नितीनकुमार देवरे,
तहसीलदार
या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था नसल्याने भक्तांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. गल्लीबोळात रस्ते तयार होत असून या मंदिरासाठी रस्ता तयार करण्यात यावा जेणेकरून भक्तांना त्या ठिकाणी जाण्यास रस्ता होईल.
कैलास माळी, गटनेते, भाजपा
पावसाळ्यातदेखील येथे जाण्यास रस्ता नसून आजूबाजूला ग्रामस्थ शौचास बसतात. रस्ता न झाल्यास आम्ही सर्व शिवभक्त उपोषण करणार आहोत.
-गोटू काबरा, शिवभक्त, धरणगाव
===Photopath===
270621\27jal_5_27062021_12.jpg
===Caption===
तीनशे पन्नास वर्षापासून मंदिराला रस्ताच नाही