यावल येथे श्री स्वामिनारायण मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 07:09 PM2018-12-12T19:09:53+5:302018-12-12T19:11:52+5:30
यावल येथील भुसावळ रस्त्यावरील श्री स्वामिनारायण मंदिरातील देवता प्राणप्रतिष्ठा सोहळयास बुधवारपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथेने सुरुवात झाली. वडताल (गुजरात) संस्थानचे गादिपती आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज यांची प्रमुख उपस्थिती आहे.
यावल, जि.जळगाव : यावल येथील भुसावळ रस्त्यावरील श्री स्वामिनारायण मंदिरातील देवता प्राणप्रतिष्ठा सोहळयास बुधवारपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथेने सुरुवात झाली. वडताल (गुजरात) संस्थानचे गादिपती आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज यांची प्रमुख उपस्थिती आहे. या कार्यक्रमास राज्यासह गुजरातमधून हजारो भाविक उपस्थित असल्याने मंदिर आवारासह समोरील पटांगणावर भव्य मंडप टाकण्यात आले आहेत.
येथील बोरोले नगरात श्री स्वामिनारायण मंदिराचे नवीन बांधकाम नुकतेच पूर्ण झाल्याने मंदिरातील देव-देवतांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा १२ ते १८ डिसेंबरपर्यत आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास स्वामिनारायण पंथाचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या गुजरातमधील वडताल संस्थानचे गादिपती प.पू.ध.धू. १००८ आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज यांची प्रमुख उपस्थीत आहेत.
मंदिरातील श्री स्वामिनारायण, श्री लक्ष्मीनारायण, श्री गणेश, हनुमान मूर्र्तींची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या हस्ते १४ रोजी होणार आहे. बुधवारपासून संगीतमय श्रीमद भागवत सप्ताहास सुरवात झाली असून, श्री भक्तीप्रकाशदास महाराज वाचक आहेत. कार्यक्रमाचे आयोजक श्री वासुदेवचरणदास महाराज आहेत. कार्यक्रमास के.के.शास्त्री, कृष्णजीवनदासजी महाराज, यांच्यासह पंथाचे अनेक शास्त्री उपस्थित असल्याने कार्यक्रमस्थळी यात्रेचे स्वरूप आले आहे.
बुधवारी सकाळीशहरातील विठ्ठल मंदिर ते कथा मंडपापर्यंत पोथीयात्रा काढण्यात आली. महोत्सवाचे मुख्य यजमान येथील प्रगतीशिल शेतकरी प्रमोद यशवंत नेमाडे, सहयजमान माणिक भिरूड, कथा यजमान घनश्याम जंगले, सहयजमान नितीन महाजन यासह विविध कार्यक्रमांचे यजमानामध्ये सलील महाजन, निर्मल चोपडे, घाटकोपर महिला मंडळ, भूमिदान योगेश्वरदासजी महाराज, श्यामसुंदरदास महाराज, वासुदेवचरणदास महाराज, प्रमोद नेमाडे, प्रमोद कोळंबे यांचा समावेश आहे.
कथेस १३ रोजी प्रारंभ होत असून, यज्ञपूजा, १४ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा असे विविध कार्यक्रम १८ डिसेंबरपर्यंत सुरू होणार आहेत.