जळगाव जिल्ह्यातल्या 'या' शहरात आहे चक्क स्मशानभूमीत सिद्धीविनायकाचं मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 02:20 PM2022-09-07T14:20:07+5:302022-09-07T14:24:26+5:30
तापी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. या मंदिराला सुमारे 100 वर्षांची परंपरा लाभली आहे.
प्रशांत भदाणे
जळगाव - आजवर तुम्ही गणरायाची अनेक मंदिरं पाहिली असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशा गणपती मंदिराची माहिती सांगणार आहोत, ज्या बद्दल तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. हे मंदिर अशा ठिकाणी उभारण्यात आलंय, ज्याठिकाणी लोक दिवसाही जायला घाबरतात... ते ठिकाण म्हणजे स्मशान. जळगावात एक गणपती मंदिर चक्क स्मशानभूमीत आहे.
जळगाव जिल्ह्यातलं भुसावळ शहर रेल्वेचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं. या शहरात यावल रस्त्यावर तापी नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीत सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. या मंदिराला सुमारे 100 वर्षांची परंपरा लाभली आहे. या मंदिरातली गणेशमूर्ती स्वयंभू आहे. ही मूर्ती तापी नदीच्या पाण्यात वाहून आली होती. काही स्थानिक लोकांनी या मूर्तीची नदीकाठी स्मशानभूमीतच चिंचेच्या झाडाखाली प्रतिष्ठापना केली होती.
सुरुवातीला याठिकाणी छोटं मंदिर होतं. पण कालांतराने सिद्धिविनायकाची महती वाढली आणि मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आता याठिकाणी भव्य मंदिर आहे. एरवी स्मशानभूमीत महादेवाचं मंदिर असल्याचं पाहायला मिळतं. पण भुसावळला असलेलं सिद्धिविनायकाचं मंदिर हे त्याला अपवाद आहे. या मंदिरातल्या गणेशमूर्तीची वैशिष्ट्ये देखील तितकीच खास आहेत. राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने या मंदिरात दर्शनासाठी येतात. चतुर्थी, अंगारकी तसंच गणेशोत्सव काळात भाविकांची मोठी गर्दी असते.