कपिलेश्वर महादेव अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी केले खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 05:43 PM2021-01-14T17:43:54+5:302021-01-14T17:44:16+5:30
कपिलेश्वर महादेव अभिषेक करून मंदिर गुरुवारी भाविकांसाठी खुले करण्यात आले.
भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथे मकरसंक्रांतीच्या पर्वावर होणारा श्री कपिलेश्वर महादेव मंदिराचा प्राचीन काळापासून सुरू असलेला यात्रोत्सव कोरोनामुळे रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे यंदा यात्रा न भरविता, केवळ कपिलेश्वर महादेवाचा अभिषेक करून, मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
गुरुवारी पहाटे पुरोहितांच्या हस्ते वैदिक मंत्रोचारात अभिषेक करून यात्रोत्सव पर्वास प्रारंभ झाला. यावेळी दिवसभरात शेकडो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. कंडारी, ता.भुसावळ येथे सुमारे ५०० वर्षापासून असलेल्या कपिलेश्वर महादेवाच्या यात्रोत्सव परंपरेची एक आख्यायिका आहे. आजतागायत येथील ग्रामस्थांनी ती जपली आहे. मात्र यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली. धार्मिक विधी करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने यात्रोत्सवाच्या दिवशी पहाटे कपिलेश्वर महादेवाचा अभिषेक व गावातून विविध समाजातर्फे दिली जाणारी मानाची पूजा कोरोनाचे नियम पाळून शांततेत केल्या.
भाविकांना मास्क लावून आणि सॅनिटाईज करूच मंदिरात प्रवेश देण्यात आला. अजय मोरे, कल्पना मोरे, सुरेंद्र सोनवणे, ट्रस्टचे अध्यक्ष गोकुळ मोरे, सदस्य मुरलीधर जेठवे, हर्षल नारखेडे, सुनील मोरे, पोलीस पाटील रामा तायडे, प्रभाकर महाजन, हरसिंग चौधरी, डिगंबर चौधरी, संजय झोपे, सुनील पेंटर, काशिनाथ गोसावी, वैभव सरोदे, चावदास मोरे उपस्थित होते.