शासनाने अधिग्रहीत केलेली मंदिरे भक्तांच्या ताब्यात द्यावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 07:30 PM2020-02-04T19:30:04+5:302020-02-04T19:32:08+5:30

यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ द्यायचे नाही. तसेच आजवर जी मंदिरे शासनाने अधिग्रहित केली आहेत, तीसुद्धा भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी शासनाला भाग पाडायचे, असा निर्धार उत्तर महाराष्ट्रातील मंदिरांच्या विश्वस्तांनी एकमुखाने केला.

The temples acquired by the government should be handed over to the devotees | शासनाने अधिग्रहीत केलेली मंदिरे भक्तांच्या ताब्यात द्यावीत

शासनाने अधिग्रहीत केलेली मंदिरे भक्तांच्या ताब्यात द्यावीत

Next
ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत एकमुखाने मागणीबैठकीत ठराव - यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ देणार नाही आणि आजवर शानसाने अधिग्रहित केलेली मंदिरे भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी शासनाला भाग पाडणार!

अमळनेर, जि.जळगाव : आजवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात ज्या ज्या मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे, त्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुराव्यानिशी बाहेर आले आहे. तसेच सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये हिंदू परंपरांचीही पायमल्ली होण्याचे संतापजनक प्रकार घडत आहेत. त्यामुळे यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ द्यायचे नाही. तसेच आजवर जी मंदिरे शासनाने अधिग्रहित केली आहेत, तीसुद्धा भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी शासनाला भाग पाडायचे, असा निर्धार उत्तर महाराष्ट्रातील मंदिरांच्या विश्वस्तांनी एकमुखाने केला.
हिंदू जनजागृती समितीच्या पुढाकारातून उत्तर महाराष्ट्रातील मंदिरांच्या विश्वस्तांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात करण्यात आले होते. या बैठकीला संत-महंत, वारकरी संप्रदायातील महाराज, उत्तर महाराष्ट्रातील विविध मंदिरांचे विश्वस्त, हिंदुत्ववादी तसेच सनदी लेखापाल आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव, प्रसिद्ध सनदी लेखापाल गोवर्धन मोदी तसेच हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी मार्गदर्शन केले.
घनवट म्हणाले, 'भारत हा जगाचा आध्यात्मिक गुरु आहे. जगात कुठेही नसतील, इतकी अनेक प्राचीन मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे भारतात आहेत. या तीर्थक्षेत्रांमधील चैतन्य आणि सात्त्विकता यांमुळेच आज भारतात सात्त्विकता टिकून आहे. असे असले, तरी वर्तमान परिस्थितीत मंदिरांची स्थिती चिंताजनक आहे. धर्मांधांकडून मंदिरांच्या जागांवर अतिक्रमण होणे, मूर्तींची तोडफोड करणे, दानपेट्या तोडणे, मंदिरांच्या उत्सवांमध्ये व्यत्यय आणणे आदी आघातांसोबतच काही ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात मंदिर विश्वस्तांना, मंदिराची देखरेख करणाऱ्यांना त्रास देण्याचा भाग होतो. काही वेळा पुरोगामी लोकांकडून मंदिरांच्या वर्षानुुवर्षे चालत आलेल्या परंपरांविषयी वाद निर्माण करून त्या परंपरा मोडित काढण्यासाठी दबाव निर्माण केला जातो किंवा मंदिराची/मंदिर विश्वस्तांची अपकिर्ती केली जाते. अशा कठीण प्रसंगांना मंदिराचे विश्वस्त मंडळ आणि मंदिराशी जोडलेले काही भाविक हेच तोंड देत असल्याने ते एकटे पडतात. ही परिस्थिती पालटण्यासाठी तसेच संघटितपणे या आघातांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे एकीकरण होणे आवश्यक आहे.

या बैठकीला अमळनेर येथील श्री मंगळग्रह सेवा संस्थान, इच्छापूर्ती गणेश मंदीर चांदवड, बालवीर हनुमान मंदिर चोपडा, श्री नवग्रह मंदिर चोपडा, कपिलेश्वर महादेव मंदिर मुडावद, श्री क्षेत्र शिवधाम रत्नपिंप्री, श्रीक्षेत्र ममलेश्वर मंदिर, रोकडोबा मारुती मंदिर धुळे, स्वामीनारायण मंदिर अमळनेर, श्रीराम मंदिर संस्थान शिरपूर, श्री नवनाथ मंदिर रत्नपिंप्री, पाचपावली मंदिर अमळनेर आदी विविध मंदिरांचे विश्वस्त तसेच वारकरी संप्रदाय, सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंदिरांचे एकिकरण असल्याने या बैठकीत 'उत्तर महाराष्ट्र मंदिर-संस्कृती रक्षा कृती समिती'ची स्थापना करण्यात आली. यापुढील उत्तर महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांची बैठक १९ एप्रिल रोजी अमळनेर येथे कपिलेश्वर महादेव मंदिरात सकाळी ११ वाजता होईल.
बैठकीत एकमुखाने संमत झालेले ठराव-
यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ देणार नाही आणि आजवर शानसाने अधिग्रहित केलेली मंदिरे भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी शासनाला भाग पाडणार!
मंदिरांकडील एकही पैसा अन्य धर्मियांसाठी खर्च करू देणार नाही!
मंदिरे ही हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्याचे केंद्र बनवण्यासाठी मंदिरांच्या माध्यमातून धर्मप्रसार करणार!
देशभरात कुठेही मंदिरावर आघात झाल्यास त्याला संवैधानिक मार्गाने विरोध करणार आणि राष्ट्रीय स्तरावर मंदिर-संस्कृती रक्षणासाठी कृतीशील रहाणार!
 

Web Title: The temples acquired by the government should be handed over to the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.