चालकास डुलकी लागल्याने टेम्पो उलटून १५ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 07:33 PM2019-07-13T19:33:59+5:302019-07-13T19:34:04+5:30
पारोळा : तालुक्यातील टेहू गावालगत नगर जिल्ह्यातून दर्शनाहून परतणा-या भाविकांच्या टेम्पोचालकास डुलकी लागल्याने टेम्पो रस्त्याखाली आदळला. हा अपघात १३ ...
पारोळा : तालुक्यातील टेहू गावालगत नगर जिल्ह्यातून दर्शनाहून परतणा-या भाविकांच्या टेम्पोचालकास डुलकी लागल्याने टेम्पो रस्त्याखाली आदळला. हा अपघात १३ जुलै रोजी पहाटे ४ वाजता घडला.
तालुक्यातील टेहू गावालगत नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोंढा देवीचे दर्शन घेऊन येणाऱ्या टेम्पोच्या चालकास डुलकी आली. त्यामुळे त्याला वाहनांचा अंदाज आला नाही. टोम्पोचा ताबा सुटत रस्त्याखाली आदळून यात तब्बल १५ भाविक जखमी झाले. यात ३ जण गंभीर जखमी असून त्यांना पारोळा येथून जळगावला उपचारार्र्थ हलविण्यात आले़
याबाबत रूग्णसेवक ईश्वर ठाकून यांनी सांगितले की, जळगाव व भुसावळ येथील दोन ते तीन कुटुंब त्यांच्या दैवत असलेल्या मोंढा देवीच्या दर्शनासाठी जळगाव येथून टेम्पो (क्रमांक एम़एच-१९-सीवाय-२५६४)ने जात होते. त्यात एकूण १५ जणांचा समावेश होता. ते १२ जुलै रोजी येथून निघाले होते. दर्शन आटोपून सदर वाहनात १३ जुलै रोजी परतीच्या मार्गावर असताना चाळीसगावमार्गे पारोळाकडे येत असताना मेहू-टेहू गावाजवळ पहाटे ४ वाजेदरम्यान टेम्पोचालकास झोपेची डुलकी आली. त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर वाहन भरवेगात रस्त्याच्या पलीकडे उलटले. त्यात एकूण १५ जण जखमी झाले. हे सर्व जळगाव व भुसावळ येथील आहेत. यात चंद्रकांत पांढरे (जळगाव), मालतीबाई पांढरे, अक्षदा पांढरे, रमेश जावरे (भुसावळ), दीक्षा शांताराम सपकाळे, इशिका भालेराव (जळगाव), मनीषा सपकाळे (भुसावळ), शांताराम सपकले (भुसावळ), भीमराव भालेराव (जळगाव), अशोक भालेराव (जळगाव), शारदा कंडेर (जळगाव), सुधाकर यवलकर, अश्विनी भालेराव, सरिता निदाने (जळगाव) या जखमींचा समावेश आहे. त्यांच्यावर पारोळा कुटीर रूग्णालय येथे डॉ़ योगेश साळुंखे, डॉ़ सुनील पारोचे, डॉ़ राहुल जैन, सुनिता काथार, राजू वानखेडे यांनी प्राथमिक उपचार केले. यावेळी ईश्वर ठाकूर यांनी सर्व रूग्णांना जळगाव येथे हलविले़
पोलिसांना माहिती नाही
विशेष म्हणजे सदर घटनेला ८ तास उलटूनही पोराळा पोलीस स्टेशनला सदर माहिती कोणी न दिल्याने याबाबत बीटचे पोलीस अनभिज्ञ होते़ वाहनाचे मोठे नुकसान झाल्याने सदर वाहन उचण्याकरिता क्रेन बोलावण्यात आले होते़