तात्पुरते अतिक्रमण काढून घ्या; महिनाभराने पुन्हा या...!
By admin | Published: February 27, 2017 01:04 AM2017-02-27T01:04:37+5:302017-02-27T01:04:37+5:30
कर्मचाºयांकडून अतिक्रमणधारकांना ‘कानमंत्र’ : महामार्गावरील अतिक्रमणांवर आज कारवाई
जळगाव: महामार्गाच्या समांतर रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम मनपा व राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणतर्फे सोमवार, २७ फेब्रुवारी पासून दोन दिवस राबविली जाणार आहे. मात्र किरकोळ वसुली करणाºया मक्तेदाराच्या कर्मचाºयांकडून या अतिक्रमणधारकांना तात्पुरते अतिक्रमण काढून घ्या, महिनाभरानंतर वातावरण थंड झाले की, पुन्हा या, असा कानमंत्र दिला जात आहे. त्यामुळे काही अतिक्रमणधारकांनी महामार्गापासून काही अंतरावर आपले साहित्य हलविल्याचे चित्र ‘लोकमत’ने रविवारी सायंकाळी केलेल्या पाहणीत दिसून आले.
अनेकांनी आधीच केले स्थलांतर
वसुली कर्मचाºयांकडून मिळालेला सल्ला ऐकून आयटीआयच्या भिंतीलगतच्या काही परप्रांतीय विक्रेत्यांनी त्यांचे रहिवासी शेड काढून स्वयंपाकाचे व दैनंदिन वापराचे सामान लगतच्या मोकळ्या जागेत नेऊन टाकले आहे. तेथेच मोकळ्या जागेत महिनाभर वास्तव्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोमवारी कारवाई सुरू होताच विक्रीसाठी आणलेले सोफे, क्रिकेट बॅट आदी साहित्यही या मोकळ्या जागेत नेऊन ठेवले जाणार आहे.
महिनाभरानंतर पुन्हा याच जागेवर पुन्हा व्यवसाय करण्याची तयारी आहे. तर काही विक्रेत्यांनी महिना-दोन महिने अन्य जिल्ह्यात जाऊन पुन्हा परत येण्याची तयारी केली आहे. तर काही टपरीधारकांनी त्यांच्या टपºया आधीच समांतर रस्त्यापासून काही अंतरावर आतील बाजूस नेऊन ठेवल्या.
अतिक्रमण रोखण्याचे आव्हान
अतिक्रमण धारकांकडून मोहीम थंडावताच पुन्हा अतिक्रमण करण्याची तयारी सुरू असल्याने ‘नही’ व मनपासमोर हे अतिक्रमण पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना राबविण्याचे आव्हान आहे. या रस्त्याच्या जागेवर सातत्याने मोहीम राबवावी लागणार आहे.
आज सकाळी ७ वाजेपासून कारवाई
मनपा व रा.म.प्रा. तर्फे पोलिसांच्या सहकार्याने सोमवारी सकाळी ७ वाजेपासून या अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. दोन दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘लोकमत’ने या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांचा विकास करण्यात आलेला नसल्याने नागरिकांना या महामार्गावरूनच ये-जा करावी लागत असून त्यामुळे अपघात होऊन निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. त्यामुळे तातडीने या समांतर रस्त्यांचा विकास करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
५५ कर्मचारी, ६ अधिकारी व ५ ट्रॅक्टर
मनपाने या समांतर रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीमेसाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक एच.एम. खान यांच्यासह बांधकाम विभागाचे ५ अभियंते तसेच बांधकाम विभागाचे ५ ट्रॅक्टर व त्यावर प्रत्येकी तीन मजूर तसेच अतिक्रमण विभागाचा ट्रक व ४० कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत.
७० पोलीस कर्मचारी व १० अधिकारी नियुक्त
अतिक्रमण निर्मूलनसाठी जिल्हा पेठ, एमआयडीसी, जळगाव तालुका व रामानंद नगर पोलीस स्टेशनमधून सोमवारी अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी रविवारी संध्याकाळी बंदोबस्ताचे नियोजन करुन प्रभारी अधिकाºयांना सूचना केल्या. सांगळे हे स्वत: मोहीम राबविताना महामार्गावर थांबणार आहेत. अतिक्रमण हटविण्यासाठी ७० पोलीस कर्मचारी व १० अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.