मालमत्ता कराचा रकमेवरील दहा टक्के सवलतीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:14 AM2021-05-01T04:14:55+5:302021-05-01T04:14:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महानगरपालिकेकडून दरवर्षी एप्रिल महिन्यात मालमत्ता करात १० टक्के सूट दिली जाते. गेल्या चार दिवसांपासून ...

Ten per cent rebate on property tax amount extended till May 31 | मालमत्ता कराचा रकमेवरील दहा टक्के सवलतीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ

मालमत्ता कराचा रकमेवरील दहा टक्के सवलतीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महानगरपालिकेकडून दरवर्षी एप्रिल महिन्यात मालमत्ता करात १० टक्के सूट दिली जाते. गेल्या चार दिवसांपासून ऑनलाइन पध्दतीने भरणा स्वीकारला जात आहे. १० टक्के सवलतीसाठी मनपाकडून ३० एप्रिलपर्यंत मुदत होती. मात्र आता नागरिकांच्या सोयीसाठी व जास्तीत जास्त भरणा व्हावा यासाठी मनपा प्रशासनाने १० टक्के सवलतीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

मालमत्ता करात १०टक्के सूट मिळत असल्याने एप्रिल महिन्यात भरणा करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते. परंतु यंदा ही सुविधा उशिराने सुरू झाली होती. सध्या शहरात लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे थेट महापालिकेच्या प्रभाग समितीत जाऊन भरणा करता येत नसल्याने नागरिकांची अडचण होत होती. अशा परिस्थितीत नागरिक १० टक्के सूटपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने सूट मिळण्याची मुदत ३० एप्रिल असल्याने त्यात वाढ करून मे अखेरपर्यंत १० टक्के सूट द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. याबाबत मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनीदेखील गुरुवारी मनपा प्रशासनाला मुदतवाढ देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या नंतर महापालिकेने शुक्रवारी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

आठ दिवसात १ कोटींचा भरणा

महापालिकेच्या घरपट्टी विभागातर्फे अद्याप यंदाच्या सन २०२१ -२०२२ या आर्थिक वर्षाची बिले वाटप झालेली नसतानाच एप्रिल महिन्यात महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयात एप्रिलअखेर सुमारे १ कोटी रुपये मालमत्ताकराचा भरणा करण्यात आला आहे. बिलांपूर्वीच ३० एप्रिलपर्यंत भरणा केल्यानंतर १० टक्के सवलत देण्याच्या योजनेला जळगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत एप्रिल महिन्यात जास्त भरणा झाल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. गेल्या वर्षी एप्रिल व मे महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत एक रुपयाची देखील वसुली झाली नव्हती. मात्र यंदा महापालिका प्रशासनाने कोरोना वरील उपाययोजनासह वसुलीवरदेखील लक्ष केंद्रित केले आहे.

महापालिका प्रशासनाने या आर्थिक वर्षात मालमत्ता कराचा भरणा आगाऊ एप्रिल महिन्यात केल्यास १० टक्के सवलत देण्याची योजना जाहीर केली होती. त्यासाठी मालमत्ताधारकांना आवाहनही करण्यात आले होते. त्यास जळगावकरांनी उत्तम प्रतिसाद देत चारही प्रभाग समिती कार्यालयात बिले देण्यापूर्वीच एप्रिल महिन्यातच आपल्या घरपट्टीचा भरणा केला आहे. महापालिका प्रशासनाने ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिल्याने महापालिकेची यंदा चांगल्या प्रकारे वसुली होण्याची शक्यता आहे.

Web Title: Ten per cent rebate on property tax amount extended till May 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.