दहा दिवसात चांदीच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:04 PM2018-01-06T12:04:07+5:302018-01-06T12:05:36+5:30
सोन्यातही चढ-उतार
विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 06- आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच खरेदीमध्ये विक्रेत्यांनी घेतलेला आखडता हात यामुळे सोन्याच्या भावात चढ-उतार सुरू आहे. मात्र चांदीच्या भावात दहा दिवसात थेट एक हजार रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे.
जळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असून येथे सुवर्ण खरेदीसाठी विविध राज्यातील ग्राहक पसंती देत असतात. सध्या सोन्याच्या भावामध्ये राजधानीत घसरण होत असली तरी जळगावात त्याचा फारसा परिणाम नाही. उलट शुक्रवारी सोन्याच्या भावात दीडशे रुपये प्रति तोळ्य़ाने वाढ झाली आहे.
दहा दिवसात सोने पाचशे रुपयांनी वधारले
सिंगापूर सराफ बाजारात सोन्याचे भावात घसरण होण्यासह भारतात राजधानी दिल्लीमध्ये ज्वेलर्सनी खरेदीत हात आखडता घेतल्याने सोन्याचे भाव गुरुवारी कमी झाले होते. जळगावातही 50 रुपये प्रति तोळ्य़ाने भावात घसरण झाली होती. मात्र शुक्रवारी पुन्हा दीडशे रुपये प्रति तोळ्य़ांनी वाढ झाली. एकूणच जळगावात सोन्याच्या भावात चढ-उतार होत असली तरी दहा दिवसात सोन्याचे भाव 500 रुपये प्रति तोळ्य़ांनी वाढले आहे.
27 डिसेंबर रोजी असलेल्या सोन्याच्या 29500 रुपये भावात एकाच दिवसात 300 रुपयांनी वाढ होऊन 28 रोजी ते 29, 800 रुपये प्रति तोळा झाले. त्यानंतर 1 जानेवारी रोजी असलेल्या 29,900 रुपये भावात 4 रोजी पुन्हा 50 रुपयांनी घसरण ते 29,850 रुपयांवर आले. यात पुन्हा 5 रोजी एकाच दिवसात 150 रुपयांनी वाढ होऊन ते 30,000 रुपयांवर पोहचले.
लग्नसराईची खरेदी नसताना भावात वाढ
सध्या गुढीमुळे लग्नसराईला ‘ब्रेक’ लागलेला आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी होणारी सोन्याची खरेदीही थांबली आहे. असे असले तरी सुवर्णनगरीत सोन्याच्या भावात 10 दिवसात 500 रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीत एक हजार रुपयांनी तेजी
सोने पाठोपाठ चांदीमध्येही 10 दिवसात तेजी आली आहे. 27 डिसेंबर रोजी 39,000 रुपये प्रति किलो असलेल्या चांदीच्या भावात एकाच दिवसात 500 रुपयांनी वाढ होऊन 28 डिसेंबर रोजी ते 39,500 रुपये झाले. त्यानंतर त्यात पुन्हा वाढ होत 5 जानेवारी रोजी हे भाव 40,000 रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम
भारतात विविध देशातून चांदीची आयात होत असते. त्यात भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती पाहता त्याचा आयातीवर परिणाम होऊन चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
जळगावात मोठय़ा दालनांमध्ये चांदीचे भाव 40 हजार रुपये किलो असले तरी लहान दुकानांमध्ये हे भाव 40,800 रुपये प्रति किलो असल्याचे चित्र आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होऊन सोने-चांदीच्या भावात चढ-उतार होत आहे. यात 10 दिवसांमध्ये चांदीचे भाव एक हजार रुपये प्रति किलोने वाढले आहे.
- गौतमचंद लुणिया, अध्यक्ष, जळगाव जिल्हा सराफ असोसिएशन.