धरणगावात दहा ग्रँम सोन्याच्या दागिन्यांसाठी वृद्धेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 09:48 PM2018-04-12T21:48:42+5:302018-04-12T21:48:42+5:30
गळा आवळून केला भरदिवसा खून
आॅनलाईन लोकमत
धरणगाव,दि.१२ : संजय नगर भागातील पाण्याच्या टाकी जवळील रहिवासी मंजुळाबाई शिवाजी महाजन (वय-७२) या वृद्धेचा अज्ञात चोरट्यांनी दहा ग्रॅम सोन्याचे दागिन्यांसाठी गळा आवळून व डोक्याला मारुन खून केल्याची घटना १२ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेच्या दरम्यान घडली. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे.
गुरुवारी सकाळी ९ वाजता मंजूळाबाई यांचा मुलगा साहेबराव हा गॅस हंडी तर सून बाजारात गेली होती. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात घूसून वृध्द महिलेचा गळा आवळला. चोरट्यांनी डोक्यात व उजव्या गालावर जबर मारहाण केल्याने वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर चोरट्याने वृद्धेच्या कानातील दहा ग्रॅम सोन्याचे दागिने काढत घटनास्थळावरून पळ काढला. शेजारी राहणारी एक लहान मुलगी ११ वाजेच्या सुमारास घरात गेली असता वृद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर या मुलीने आरडाओरड करीत बाहेर आली. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनेबाबत वृद्धेचा मुलगा व सुनेला माहिती दिली. त्यांनी तत्काळ घरी येत आक्रोश केला. मयत मंजुळाबाई यांची मुलगी भोपाळ येथे असल्याने शुक्रवार १३ रोजी सकाळी ९ वा.संजय नगर येथून अंत्ययात्रा निघणार आहे.
भरदिवसा झालेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती
भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे रहिवाशांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक़ प्रशांत बच्छाव,चोपडा विभागाचे पो.उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक बी.डी.सोनवणे यांनी भेट दिली. तत्काळ श्वान पथक, ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. बाजाराचा दिवस असल्याने गल्लीत असलेल्या शांततेचा फायदा चोरट्याने घेत आपला डाव साधला.
राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भेटी
या घटनेची माहिती मिळताच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, शिवसेना जिल्हाप्रमूख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष सलीम पटेल, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देवून परिवाराचे सांत्वन केले.
अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल
या घटनेसंदर्भात मयत महिलेचा मुलगा साहेबराव शिवाजी महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात भादंवि कलम ३९४, ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, पोलीस शिपाई मिलींद सोनार हे करीत आहे.