‘अनलॉक’ च्या दहा महिन्यानंतरही विविध क्षेत्रात ‘लॉक’ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:16 AM2021-03-23T04:16:59+5:302021-03-23T04:16:59+5:30
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली लाॅकडाऊनची प्रक्रिया विविध निर्बंध टाकत अजूनही सुरूच आहे. २३ मार्च ...
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली लाॅकडाऊनची प्रक्रिया विविध निर्बंध टाकत अजूनही सुरूच आहे. २३ मार्च २०२० पासून करण्यात आलेले लाॅकडाऊन मे महिन्यात काहीसे शिथिल झाले खरे मात्र दहा महिन्यानंतरही विविध क्षेत्रात लॉकडाऊन कायम आहे. यात मध्यंतरी काही दिवस सुरू झालेले चित्रपटगृह, शाळा, महाविद्यालय, आठवडे बाजार, हॉटेल बंदच आहे.
२३ मार्च २०२० पासून जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यासह जीवनावश्यक वस्तू व आता इतर व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिले होते. या आदेशाला २३ मार्च २०२१ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभराच्या या काळात अजूनही पूर्णपणे अनलॉक झालेलेच नाही. मध्यंतरी शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृहे, हॉटेल हे सर्व सुरू झाले मात्र कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने हे संपूर्ण व्यवहार व आठवडे बाजार देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी गेल्या वर्षीच्या सारखी स्थिती पुन्हा आता उद्भवत आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात लाॅकडाऊन झाल्यानंतर ५ मे पासून त्यातील शिथिलता देण्यास सुरुवात झाली. यामध्ये मॉल व हॉटेल वगळता तसेच व्यापारी संकुल सोडून इतर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे विस्कटलेली आर्थिक घडी काहीशी रुळावर येऊ लागली.
लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्याने एकल दुकान असलेल्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला. मात्र जळगाव शहरातील संकुल असलेले फुले मार्केट, गोलाणी मार्केट व इतर संकुल बंदच होते. ५ मे पासून शहरातील एकल दुकाने सुरू झाली व १० मे पासून पुन्हा बंद झाली होती. त्यामुळे पुन्हा एक महिन्यानंतर जून महिन्यात दुकाने सुरू झाली.
शहर व जिल्ह्यात ३ जूनपासून तीन टप्प्यात लॉकडाऊन शिथिल झाले.
पहिल्या टप्प्यात सर्व बाजार, दुकाने, सार्वजनिक मैदाने खुली झाली मात्र मॉल्स, चित्रपटगृह, शाळा, बार आणि बाजार संकुले बंदच होती. बाजार व दुकाने सम-विषम तत्त्वावर सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा देण्यात आली. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधित झोनमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवले. मात्र त्याबाहेर अनेक मुभा देण्यात आल्या आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे. धार्मिक स्थळे आणि उपासना स्थळे, सलून आणि ब्युटी पार्लर बंदच राहणार होती. सायकलिंग, धावणे, चालणे, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली. तसेच सार्वजनिक मैदानेही खुली केली. ८ जूनपासून सर्व खासगी कार्यालये आवश्यकतेनुसार १० टक्केपर्यंत कर्मचाऱ्यांसह सुरू झाली आणि उर्वरित व्यक्ती घरून काम करण्यास मुभा देण्यात आली.
पुन्हा लॉकडाऊन
विविध व्यवहारांना शिथिलता देत असताना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने जळगाव शहरात ७ जुलै पासून कडक लाॅकडाऊन करण्यात आले. सात दिवसांच्या या लाॅकडाऊन मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाना देखील बंद ठेवण्यात आल्या. यात केवळ दूध व औषधी दुकाने सुरू होते. त्यानंतर जिल्ह्यात नगरपालिका मार्फत जनता कर्फ्यू सुरू करण्यात आला.
अखेर व्यापारी संकुल सुरू
शहरातील विविध व्यवहार सुरू होत असताना व्यापारी संकुल मात्र बंद होते. यासाठी व्यापाऱ्यांनी जिल्ह्यासह राज्यस्तरावर पाठपुरावा केला. मात्र त्यांना तब्बल पाच महिने व्यापारी संकुल सुरू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. यामध्ये ५ ऑगस्टपासून ही व्यापारी संकुले सुरू झाली व फुले मार्केट, गोलाणी मार्केट सह सर्वत्र बाजारपेठ गजबजली.
सप्टेंबर नंतर रुग्णसंख्या घटली मात्र निष्काळजीपणा वाढला
जिल्ह्यात रुग्ण संख्या हळूहळू घटत जाऊन सर्वांना दिलासा मिळाला. सप्टेंबर पासून तर रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. मात्र या काळात लग्न, निवडणुका, बाजारपेठेतील गर्दी व सार्वजनिक कार्यक्रमासह राजकीय मेळावे यामुळे गर्दी वाढल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत गेला व फेब्रुवारीच्या मध्यापासून मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येऊ लागले.
कारवाईचा धडाका
गर्दीला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या वतीने लग्न सोहळा असो की मंगल कार्यालय या ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू केला. मात्र तरीदेखील रुग्ण संख्या नियंत्रणात येत नसल्याने अखेर १२ ते १४ मार्च दरम्यान महापालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. इतकेच नव्हे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अजूनही पुढील आदेशापर्यंत अनेक निर्बंध असल्याने शाळा, महाविद्यालय, चित्रपटगृहे, हॉटेल, आठवडे बाजार हे कधी सुरू होणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे.