आडगावातील शेतकऱ्यांनी एकाच दिवशी विकल्या दहा बैलजोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 01:02 AM2018-09-22T01:02:23+5:302018-09-22T01:05:23+5:30
चाळीसगाव तालुक्यातील आडगाव परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावट गडद होत चालले असून चारा पाण्याअभावी गावातील शेतकºयांनी दहा बैलजोड्या विकल्याची घटना घडली आहे.
आडगाव ता.चाळीसगाव : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने सुरूवातीपासूनच दगा दिल्याने परिसरात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून शेतकरी हतबल झाला आहे. स्वत:च्याच जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असून पशुंना जगवायचे कसे याचा पेच पडला आहे. त्यामुळे गुरांना बाजाराचा रस्ता दाखवला जात असून आडगाव येथील शेतकºयांनी एकाच दिवशी तब्बल दहा बैलजोड्या विकल्याची घटना घडली आहे. अजून काही शेतकरी बैल जोडी व इतर गुरे विकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात आले. जिवाच्या मैतराला विकतांना शेतकºयांच्या जीवाचे अक्षरश: पाणी पाणी झाले होते.
आडगांवसह संपूर्ण मन्याड परिसरात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस गडद होत चालल्याने पिके तर वाया गेलीच आहेत, आता तर मुक्या जनावरांना जगवायचे कसे असा मोठा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. आडगांवसह परीसरातील बहुतेक गावांतील शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बैलजोडी, शेळ्या पाळतो. शेतात मुबलक पाणी व चारा उपलब्ध राहत असल्याने गुरे पाळणे सोयीस्कर होते. परंतु गेल्या दोन/तीन वर्षापासून परिसरात पावसाचे प्रमाण कमी कमी होत गेल्याने चारा व पाण्याचा प्रश्न गहन होत गेला आहे. थोड्या फार पाण्यावर चारा वगैरे टाकून आतापर्यंत शेतकºयांनी काटकसरीने पूरविले. या वर्षी खरीपात टाकलेला चारा व गवत पाण्याअभावी जळून गेल्याने या शिवाय परीसरात हीच परिस्थिती राहील्याने आतापासूनच चारा कुठून विकत आणावा ? महागडा चारा किती गुरांना पूरवावा, याचा ताळमेळ बसत नसल्याने मोठ्या हताश मनाने शेतकºयांनी मुक्या जनावरांना पाणी व चाºयाअभावी अर्धपोटी राहू देण्यापेक्षा त्यांना विकलेले बरे असा निर्णय घेत एकाच दिवशी दहा बैलजोड्या विकल्या. अजूनही काही शेतकरी पशुधन विकण्याच्या तयारीत आहेत. तर काही जण साखर कारखान्यांचा हंगाम संपेपर्यंत चारा पाणीसाठी मुकादमाच्या हवाली करणार आहेत. वर्षभर शेतात राबणाºया सर्जा- राजाला विकतांना किंवा साखर कारखान्यासाठी ऊसाची वाहतूक करण्यासाठी मुकादमाच्या हवाली करतांना शेतकºयाच्या जिवाची घालमेल होत आहे.