दहा वर्षीय मुलाचा रेबीजने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:05+5:302021-07-04T04:13:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ममुराबाद शिवारात कुत्र्याने चावा घेतलेल्या भरत बालसिंग बारेला या दहा वर्षीय मुलाचा शनिवारी दुपारी ...

Ten-year-old boy dies of rabies | दहा वर्षीय मुलाचा रेबीजने मृत्यू

दहा वर्षीय मुलाचा रेबीजने मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ममुराबाद शिवारात कुत्र्याने चावा घेतलेल्या भरत बालसिंग बारेला या दहा वर्षीय मुलाचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. त्याच्या ओठाजवळ कुत्रा चावला असल्याने शिवाय मेंदूपर्यंत संसर्ग गेल्याने त्याचा रेबीजने मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. त्याला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात शुक्रवारी दुपारी दाखल करण्यात आले होते.

भरत हा आई-वडिलांसह ममुराबाद येथे शेतातच वास्तव्यास होता. १४ जून रोजी त्याचे वडील शेतात काम करत असताना तो आई-सोबत बाहेर बसलेला होता. यावेळी अचानक एका कुत्र्याने भरत याच्या ओठांचा लचका तोडला होता. यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी ३ दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. त्याचे तीनही डोस पूर्ण झाले होते. त्याची जखमही भरली होती.

चार दिवसांपासून येत होते चक्कर

भरत याला गेल्या तीन ते चार दिवसांपासून अचानक चक्कर येणे, डोके दुखण्याचा त्रास होत होता. चालता चालता तो अचानक खाली पडून जात होता. त्याला खासगी रुग्णालयातही नेण्यात आले होते. माजी उपमहापौर सुनील खडके यांनी या कुटुंबाला मदत करीत या मुलाला जिल्हा रुग्णालयातून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले होते. संशयित रेबीज असल्याने त्याला स्वतंत्र कक्षाची आवश्यकता होती. मात्र, या ठिकाणी ती नसल्याने शिवाय त्याला अन्य रुग्णांच्या संपर्कात ठेवता येत नसल्याने मुलाला औरंगाबाद घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी आई-वडिलांना दिला होता. दरम्यान, त्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दुसऱ्या कुत्र्याचा मृत्यू

भरत याला चावा घेतलेल्या कुत्र्याने एका अन्य दुसऱ्या कुत्र्याला चावा घेतला होता, त्या कुत्र्याचाही दोन दिवसातच मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कुत्र्याला रेबीजची लागण झाली असून तो अन्य लोकांसाठी धोकादायक असल्याने त्याचा त्याचा लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

कोट

भरत बारेला हा शुक्रवारी दुपारी रुग्णालयात दाखल झाला होता. संशयित रेबीज म्हणून एक प्रयत्न म्हणून त्याला औरंगाबाद येथे शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला आम्ही कुटुंबीयांना दिला होता. मात्र, ते त्याला घरी घेऊन गेले. त्याच्या ओठांना कुत्र्याने चावा घेतला होता. मेंदूच्या जेवढ्या जवळ चावा तेवढा रेबीजचा धोका अधिक असतो. - डॉ. विजय गरकल, बालरोगतज्ञ डॉ. उल्हास पाटील रुग्णालय

कधीही होऊ शकतो रेबीज

रेबीज हा कुत्र्याने चावल्यानंतर कधीही होऊ शकतो. तो चार ते पाच वर्षांनी, कधी तात्काळ तर आयुष्यात कधीही उद्भवू शकतो. रेबीज झाल्यास यात शंभर टक्के मृत्यूदर असतो, असे डॉ. गरकल यांनी सांगितले. रेबीज झालेल्या कुत्र्यापासूनच शक्यतोवर तो होऊ शकतो. प्रत्येक कुत्रा चावल्याने रेबीज होईलच असेही नाही, या रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्ष लागतो.

Web Title: Ten-year-old boy dies of rabies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.