बस स्थानकातील पार्किंगसाठी पुन्हा तिसऱ्यांदा निविदा काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:12 AM2021-07-01T04:12:48+5:302021-07-01T04:12:48+5:30
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव आगारात नागरिकांच्या व एसटी कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी महामंडळातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून पार्किंगची सुविधा करण्यात आली होती; ...
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव आगारात नागरिकांच्या व एसटी कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी महामंडळातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून पार्किंगची सुविधा करण्यात आली होती; मात्र तीन वर्षांपूर्वी एका मक्तेदाराने अटीशर्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवता, आगार प्रशासनातर्फे या मक्तेदाराचा ठेका रद्द करण्यात आला. तेव्हापासून बस स्थानकातील पार्किंग बंदच आहे. स्थानकात पार्किंग नसल्यामुळे नागरिक थेट बस स्थानकात दुचाकी पार्किंग करत आहेत. दररोज स्थानकात १०० ते १५० दुचाकी बेशिस्त पार्किंग करण्यात येत असल्यामुळे स्थानकात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे अपघात घडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. तीन वर्षांपासून स्थानकातील रखडलेल्या पार्किंगच्या प्रश्नाबाबत `लोकमत`ने वृत्त मांडताच विभाग नियंत्रकांनी पार्किंग पुन्हा करण्यासाठी लवकरच तिसऱ्यांदा निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, महामंडळातर्फे भाडे तत्त्वावर देण्यात येणाऱ्या पार्किंगचा दर जास्त असल्यामुळे अनेक मक्तेदार निविदा भरत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.