मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी ‘निविदा पे निविदा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:19 AM2021-04-30T04:19:52+5:302021-04-30T04:19:52+5:30

एक निविदा प्राप्त झाली; मात्र ती देखील करण्यात आली नामंजूर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून ...

‘Tender Pay Tender’ for sterilization of Mokat dogs | मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी ‘निविदा पे निविदा’

मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी ‘निविदा पे निविदा’

Next

एक निविदा प्राप्त झाली; मात्र ती देखील करण्यात आली नामंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात गेल्या वर्षभरापासून मोकाट कुत्र्यांची समस्या बिकट झाली आहे. मोकाट कुत्र्यांच्या वाढत जाणाऱ्या संख्येमुळे शहरात रात्रीच्या वेळेस बाहेर पडणेही कठीण झाले आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडून मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर देखील एकच निविदा प्राप्त झाली; मात्र निवडीनुसार अटी-शर्तींची पूर्तता न झाल्यामुळे एकही निविदा मंजूर करण्यात आली नाही. यामुळे महापालिका आरोग्य विभागाकडून शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी पुन्हा ‘निविदा पे निविदा’ असा खेळ सुरू होणार आहे.

शहरात सद्यस्थितीत १८ हजारांहून अधिक मोकाट कुत्र्यांची संख्या झाली आहे. एकीकडे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून, दुसरीकडे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. गेल्या वर्षभरात मोकाट कुत्र्यांच्या चाव्यामुळे ४५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. त्यातच वर्षभरापासून शहरातील मोकाट कुत्र्यांवरील निर्बीजीकरणाचे काम देखील बंद पडले आहे. ॲनिमल वेल्फेअर या संस्थेने अमरावती येथील कंपनीला महापालिकेने दिलेला ठेका रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका आरोग्य विभागाने तीन वेळा निविदा काढून वर्धा येथील संस्थेची एकमेव निविदा पात्र ठरली होती. मात्र कागदपत्रांची पूर्तता न केल्याने व स्थानिक स्वराज्य संस्थेत तीन वर्षांच्या कामाच्या अनुभवाची पात्रता सिद्ध न केल्यामुळे ही निविदा अपात्र ठरवण्यात आलेली आहे. तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर वर्धा येथील सर्वाेदय गाेशाळा चॅरिटेबल ट्रस्टची एकमेव निविदा प्राप्त झाली हाेती. मात्र ही निविदा देखील अपात्र ठरल्यामुळे मनपा आराेग्य विभागाकडून आता पुन्हा निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी किमान पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यातही तीन निविदा प्राप्त न झाल्यास पुन्हा मुदतवाढीचा खेळ सुरू हाेण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जळगावकरांना माेकाट कुत्र्यांचा त्रास आणखी काही दिवस सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट आहे.

निविदा प्राप्त होत नसतील तर अटी-शर्तींमध्ये बदल करावा

महापालिकेकडून गेल्या वेळेस देखील सलग वर्षभर निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर अमरावती येथील एकमेव संस्था पात्र ठरली होती. त्या संस्थेचे काम रद्द केल्यानंतर महापालिकेने पुन्हा निविदा प्रक्रिया राबवली. त्यात तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर वर्धा येथील एकमेव संस्था पात्र ठरली, मात्र छाननीनंतर ती संस्था देखील अपात्र ठरली आहे. महापालिकेच्या निवेदनाला वारंवार प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिका आरोग्य विभागाने आपल्या अटी व शर्तींमध्ये बदल करण्याची गरज आहे. याच अटी-शर्ती कायम राहण्यास निविदा प्रक्रियेला पुन्हा त्याच त्याच अडचणींना सामोरे जावे लागेल. यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या ही कायमच नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू शकते. मनपा प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. नाहीतर मोकाट कुत्र्यांची ही संख्या २५ हजारांची संख्यादेखील पार करू शकते.

Web Title: ‘Tender Pay Tender’ for sterilization of Mokat dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.