ॲलम खरेदीत चौथ्या निविदाधारकाला दमदाटी करून निविदा राबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:53+5:302021-06-30T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : उमाळा जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्य ॲलम (पिवळी तुरटी) वरून महापालिकेतील राजकारण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : उमाळा जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्य ॲलम (पिवळी तुरटी) वरून महापालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. ॲलमच्या दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल २५०० रुपयांची वाढ करण्यात आल्याने मनपाच्या तिजोरीवर यामुळे भार पडणार आहे, असे असताना ही निविदा मनपाच्या संगनमताने व चौथ्या निविदाधारकाला दमदाटी करून ही प्रक्रिया राबविण्यात आली असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केला आहे.
प्रशांत नाईक यांनी याबाबत मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांना निवेदन सादर केले असून, हा ठराव मनपाच्या तिजोरीवर भार टाकणारा असून, या ठरावाला स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात येऊ नये, अशी मागणीदेखील केली आहे. मनपा स्थायी समितीच्या सभेचे आयोजन बुधवारी सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले आहे. या सभेत एकूण ११ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले असले तरी ही सभा ॲलमच्या मुद्द्यावरून गाजण्याची शक्यता आहे. यासह दररोजच्या बाजार शुल्क वसुलीच्या ठेक्यावरूनदेखील स्थायीच्या सभेत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
पती व पत्नीच्या नावावर कंपन्या
शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सभापतींना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चार निविदा असताना मुद्दामहून निविदाधारकांचे ई-टेंडर फीची पावती व शंभर रुपयांचे प्रतिज्ञापत्र व कागदपत्र नसल्यामुळे अपात्र ठरवले आहे. शासन नियमानुसार त्रुटी असल्यास कागदपत्रे मागवावे लागतात. परंतु प्रशासनाने कागदपत्रांची मागणी केली नाही. जर निविदाधारकाने ई-टेंडर भरले नाही, तर डाऊनलोड कसे करू शकता? असे सवाल उपस्थित केले आहेत. तसेच विक्रम केमिकल्स व अलमायटी केमिकल्स या दोघांचे मालक पती व पत्नी आहेत. अलमायटी केमिकल्स यांच्या दरात नेहमी वाढ असते तर विक्रम केमिकल्स यांची निविदा पात्र होत असते. यामध्ये सर्वांची मिलीभगत असल्याचाही आरोप नाईक यांनी केला आहे.