त्या ७० कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामांची ३१ मार्चपर्यंत निघणार निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:27 AM2021-03-13T04:27:50+5:302021-03-13T04:27:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. बिकट होत जात असलेल्या या समस्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. बिकट होत जात असलेल्या या समस्या बद्दल आता नागरिक रस्त्यांवर उतरून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करू लागले आहेत. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी आता नवीन रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर केला असून, या निधीतून होणाऱ्या कामांसाठी ३१ मार्चपर्यंत निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आतापर्यंत अडीच वर्षाचा कार्यकाळात सत्ताधाऱ्यांकडून केवळ मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली असून, एकही ठोस काम सत्ताधाऱ्यांना करता आलेले नाही. त्यात रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून प्रत्येक जळगावकरांना या रस्त्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच खराब रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या धुळीच्या समस्येवर आता नागरिकांचा संताप देखील रस्त्यांवर येऊ लागला आहे. अशा परिस्थितीत शहरातील नवीन रस्त्यांच्या कामांना पावसाळ्यापूर्वी सुरुवात करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. गुरुवारी शासकीय सुट्टी असताना देखील महापालिकेच्या अभियंत्यांनी ७० कोटी रुपयांमधून होणार्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू ठेवले होते. ३१ मार्चपर्यंत कामाचे अंदाजपत्रक तयार करून यासाठीची निविदा प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे. यासाठी महापालिकेची बांधकाम विभागातील संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.
मुख्य रस्त्यांसह कॉलनी भागातील रस्त्यांचा समावेश
अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे ९० टक्के तर भुयारी गटार योजनेचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामुळे आता सत्ताधाऱ्यांना खराब रस्त्यांच्या समस्या साठी अमृत योजनेचे कारण पुढे करता येणार नाही. यामुळे राज्य शासनाकडून कोणतेही निधीची वाट न पाहता मनपा फंडातून लवकरात लवकर कामे सुरू करण्यासाठी सत्ताधार्यांनी तयारी सुरू केली आहे. ७० कोटींच्या निधीतून शहरातील मुख्य रस्त्यासह कॉलनी भागातील रस्त्यांना देखील प्राधान्य दिले जाणार आहे.
आता केलेली घोषणा केवळ घोषणाच ठरू नये
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून शहरातील रस्त्यांचा समस्यांबाबत अनेक वेळा कोट्यवधींची घोषणा केली आहे. त्यातून एकही रस्त्याचे काम सत्ताधाऱ्यांना आतापर्यंत करता आलेले नाही. सप्टेंबर महिन्यात मनपा फंडातून ३० कोटींच्या निधीचा ठराव करण्यात आला होता. या निधीतून होणाऱ्या कामाचे अंदाजपत्रक महापालिका प्रशासनाने तयार केल्यानंतर हा ठराव सत्ताधाऱ्यांनी रद्द केला. तसेच पुन्हा त्यात १५ कोटींचे वाढ करून ४५ कोटींचे ठराव केला. हा ठराव देखील रद्द करून आता पुन्हा ७० कोटींच्या निधीतून होणार्या कामांचा ठराव सत्ताधाऱ्यांनी केला आहे. आता महापालिकेने यासाठी अंदाज पत्र तयार करण्याचे काम सुरू केले असले, तरी नगरसेवक पुन्हा त्यात बदल करतील व पुन्हा हे काम रखडण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने जरी पावसाळ्यापूर्वीच कामे सुरू करण्याची तयारी सुरू केली असली तरीही यामध्ये सत्ताधाऱ्यांकडून नेहमीप्रमाणे खोडा घालण्यात येऊ नये अशी अपेक्षा जळगावकरांना आहे.
मनपा फंडातून कामे असल्याने निविदांना प्रतिसाद मिळणे कठीण ?
महापालिका प्रशासनाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यातच ७० कोटींची होणारी कामे ही मनपा फंडातून होत असल्याने, या कामांसाठी मनपा निधी कोठून उभी करणार हा देखील प्रश्न आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने ७० कोटींचा रस्त्यांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवली तरीही या निविदांना कंत्राटदारांकडून कसा प्रतिसाद मिळेल याकडे लक्ष लागले आहे. मध्यंतरी महापालिकेने काढलेल्या नऊ कोटींचा रस्ते दुरुस्तीच्या निविदांना कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. महापौरांनी याबाबत कंत्राटदारांची बैठक घेऊन त्यांना महापालिकेकडून तात्काळ बिलं उपलब्ध होऊन जातील असे आश्वासन दिल्यानंतर या निविदांना प्रतिसाद मिळाला होता.