रुग्णाच्या मृत्यूनंतर गजानन हार्ट हॉस्पिटलमध्ये तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:13 AM2021-04-26T04:13:49+5:302021-04-26T04:13:49+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिरसोली येथील चावदास शंकर ताडे (बारी, ५४) यांचा गजानन हॉर्ट हॉस्पीटलमध्ये रविवारी दुपारी ...

Tension at Gajanan Heart Hospital after patient's death | रुग्णाच्या मृत्यूनंतर गजानन हार्ट हॉस्पिटलमध्ये तणाव

रुग्णाच्या मृत्यूनंतर गजानन हार्ट हॉस्पिटलमध्ये तणाव

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिरसोली येथील चावदास शंकर ताडे (बारी, ५४) यांचा गजानन हॉर्ट हॉस्पीटलमध्ये रविवारी दुपारी १.२० वाजता मृत्यू झाला. डॉक्टरांनी व्हेंटीलेटर न लावल्याने व चुकीचे इंजेक्शन दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप करीत आधी डॉक्टरांवर कारवाई करा, तेव्हाच मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी जिल्हा पेठ पाेलिसांनी दाखल होत, डॉक्टरांची विचारपूस केली व नातेवाईकांची समजूत घातली. अखेर तक्ररीनंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

चावदास ताडे हे गेल्या १३ दिवसांपासून कोरोना बधित म्हणून आशिर्वाद हॉस्पीटलला उपचार घेत होते. त्या ठिकाणी बायपॅप मशिनवर त्यांची ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. त्यांची दुसरी ॲन्टीजन चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर अखेर त्यांना मोठे व्हेंटीलेटर लावावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर ताडे यांना शनिवारी सायंकाळी गजानन हार्ट हॉस्पीटलला आणण्यात आले. रविवारी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. यावेळी शिवसेनेच्या मंगला बारी उपस्थित होत्या. पोलिसांनी आल्यानंतर नातेवाईकांना गर्दी न करता लेखी तक्रार देण्याचा सल्ला दिला. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बोरसे यांनी डॉक्टरांसोबत चर्चा केली व नातेवाईकांची समजूत घातली. दुपारी एक तास या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

नातेवाईकांचे आरोप

व्हेंटीलेटर असतानाही रुग्णाला व्हेंटीलेटर लावण्यात आलेले नव्हते. एनआयव्ही मशिनसुद्धा उपस्थित डॉक्टरांना लावता येत नव्हती, ती बाहेरून डॉक्टर बोलवून लावण्यात आली. सकाळी ९ वाजता रुग्ण बोलत होते. त्यांनी कुटुंबियांची विचारपूस केली. सर्व व्यवस्थित असताना, त्यांना डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिले व दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांची ऑक्सिजन पातळी ६० वर पोहचल्यानंतर आम्ही मुख्य डॉक्टरांना बोलविण्याचा प्रयत्न केला मात्र, तीन तास ते आले नाही. मी एका ठिकाणी मृत्यू झाला तेथे गेलो होतो, नातेवाईकांकडे होतो, अशी वेगवेगळी उत्तरे उॉक्टर देत होते. जे उपस्थित होते ते डॉक्टर मुख्य डॉक्टर आल्यावरच व्हेंटीलेटर लावू अशी बेजबाबदारीची उत्तरे देत होते. डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे आमच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृत चावदास ताडे यांचे छोटे बंधू श्रावण ताडे यांनी आक्रोश केला होता.

आधी ॲडव्हान्स

रुग्णाला दाखल करण्या अधी रुग्णालयाने आम्हाला आधी ४० हजार रुपये ॲडव्हान्स व १० हजार मेडिकलला भरायला सांगितले. आम्ही ते तातडीने भरले, मात्र, तातडीने उपचार सुरू झाले नसल्याचे मृत चावदास ताडे यांचे भाचे महेंद्र बारी यांनी सांगितले.

सहा महिन्यापूर्वी आई वडील कोरोनामुक्त

चावदास ताडे यांचे वृद्ध आई-वडील हे सप्टेबर महिन्यात कोरोना बाधित झाले होते. त्यावेळी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात ताडे हे पूर्ण वेळ थांबून होते. आई-वडिल कोरोनामुक्त झाले. सहा महिन्यानंतर मात्र, चावदास ताडे यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला होता.

कोट

रुग्ण गेल्या १६ दिवसांपासून व्हेंटीलेटरवर होते. निगेटीव्ह आल्यानंतर आमच्याकडे दाखल केले तेव्हा त्यांची ऑक्सिजन लेव्हल ही ३८ पर्यंत खाली आली होती. आमच्याकडे एनआयव्हीवर त्यांची ऑक्सिजन लेव्हल ९५ झाल्याने त्यांना मोठे व्हेंटीलेटर लावले नाही. मात्र, ते त्यांच्या बाजुलाच व त्यांच्यासाठीच होते. त्यांना ॲन्टीबायोटीक रात्रीच दिले होते. दुपारी १ वाजून २० मिनिटांनी त्यांचे हृदय बंद पडले व त्यांचा मृत्यू झाला. या ठिकाणी एक हृदयरोगतज्ञ असल्याने शिवाय मी दुसऱ्या शस्त्रक्रियेत असल्याने येऊ शकलो नाही. मात्र, आमचे डॉक्टर होतेच.

- डॉ. विवेक चौधरी, गजानन हार्ट हॉस्पीटल, जळगाव.

Web Title: Tension at Gajanan Heart Hospital after patient's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.