विवाहितेच्या मृत्यूने तणाव
By Admin | Published: February 2, 2017 01:22 AM2017-02-02T01:22:27+5:302017-02-02T01:22:27+5:30
शवविच्छेदनास नकार : तब्बल पाच तास चालला गोंधळ
जळगाव : कंजरवाडय़ातील संजय गांधी नगरात सलोनी विश्वास गारुंगे (वय 35) या विवाहितेने बुधवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्काराची तयारी केल्याने माहेरच्या लोकांनी सलोनी हिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करुन अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला, त्यामुळे कंजरवाडा परिसरात दुपारी साडे चार वाजेर्पयत तणावाची स्थिती होती.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सलोनी गारुंगे या विवाहितेने बुधवारी दुपारी बारा वाजता घरात कोणीच नसताना गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकाकडे साखरपुडय़ाच्या कार्यक्रमास गेलेल्या पती विश्वास गारुंगे यांना गल्लीतील लोकांनी घटना कळवली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून सलोनी यांना खासगी दवाखान्यात नेले, तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर मृतदेह घरी आणण्यात आला. दीड वाजेच्या सुमारास अंत्यसंस्काराची तयारी करीत असताना समोरच राहणा:या माहेरच्या लोकांनी त्यास विरोध केला. सलोनी हिचा छळ सुरु होता, त्यामुळे तिचा मृत्यू संशयास्पद आहे, असा आरोप करुन नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले.
पोलीस स्टेशनला गोंधळ
सासरच्या लोकांवर कारवाई करावी म्हणून 50 च्यावर महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. सहायक निरीक्षक सचिन बागुल, समाधान पाटील, हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत, प्रकाश पवार यांनी तातडीने नियंत्रण कक्षातून अतिरिक्त कुमक मागवून घटनास्थळ गाठले. तेथेही मृतदेह उचलण्यास नातेवाईकांनी विरोध केला.
पोलिसांनी दोन्ही गटाची समजूत घातल्यानंतर एका रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.