डॉक्टर नसल्याने मानसोपचार विभागालाच टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:13 AM2021-01-02T04:13:34+5:302021-01-02T04:13:34+5:30
जळगाव : नियुक्त एकमेव वरिष्ठ निवासी डॉक्टर रजेवर गेल्याने, शिवाय ते परत येत नसल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचार ...
जळगाव : नियुक्त एकमेव वरिष्ठ निवासी डॉक्टर रजेवर गेल्याने, शिवाय ते परत येत नसल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचार विभागामुळे आता प्रशासनाचा तणाव वाढणार असल्याचे चित्र आहे. या विभागाचा भार औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या डॉक्टरांवर आला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असलेल्या विविध विभागांमध्ये मनुष्यबळ हा मुद्दा नॉन कोविडनंतर आता हळूहळू समोर येत असल्याचे चित्र आहे. महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील करार हा पुन्हा तीन वर्षांच्या नूतनीकरणासाठी पाठविण्यात आला आहे. तोपर्यंत जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे. मात्र, तीही पुरेशी नसल्याने प्राध्यापक, डॉक्टरांवर अतिरिक्त भार वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे मानसिक रुग्णांना मात्र, योग्य वैद्यकीय सेवा मिळेल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. महाविद्यालय व रुग्णालयात अन्य यंत्रणा, अन्य सुविधा सुधारत असताना डॉक्टरांची कमतरता हा मुद्दा डोकेदुखी वाढविणारा ठरणार असल्याचे चित्र आहे.
विभागाचे एकही तज्ज्ञ डॉक्टर नाहीत
नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार दीडशे विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक, एक सहयोगी आणि एक सहायक प्राध्यापक अशी यंत्रणा हवी. मात्र, गंभीर बाब म्हणजे मानसोपचार विभागात आता एकही तज्ज्ञ डॉक्टर, प्राध्यापक नाही. हा विभाग औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या अंतर्गत येत असल्याने या डॉक्टरांनाच हा विभाग सांभाळावा लागत आहे. या विभागाचे एकमेव वरिष्ठ निवासी डॉ. दिलीप महाजन हे रजेवर गेल्याने हा विभाग आता पूर्णत: रिकामा झाला आहे.