बॅनर फाडल्याने तणाव, रास्ता रोको अन् मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 10:46 PM2021-02-16T22:46:53+5:302021-02-16T22:47:37+5:30
नगरपालिकेचा जाहिरात कर बुडवणाऱ्या डिजिटल प्रेसवाल्यांचे बॅनर फाडून पालिकेने कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : नगरपालिकेचा जाहिरात कर बुडवणाऱ्या डिजिटल प्रेसवाल्यांचे बॅनर फाडून पालिकेने कारवाई केली आहे. दरम्यान, ठराविक समाजाचेच बॅनर फाडण्यात आल्याचे सांगत काही नागरिकांनी रास्ता रोको करत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.
मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, मुकादम अनिल बेंडवाल, मुकादम अनिल बाविस्कर, सुधाकर बिऱ्हाडे, गणेश ब्रमहें आदींनी शहरातील सुभाष चौक, नगरपालिका व इतर भागात पालिकेच्या जागेवर विविध जाहिरातीचे लावलेले डिजिटल बॅनर फाडून कारवाई केली आहे\ गेल्या वर्षभरापासून डिजिटल प्रेस वाल्यानी पालिकेला जाहिरातीच्या कराच्या रुपात एक रुपया ही न देता जाहिरातदारांकडून १० पट पैसे घेऊन शहर विद्रुपीकरण केले होते उपमुख्याधिकारी गायकवाड यांनी कारवाई सुरू केली आहे. कारवाईसाठी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावले असता त्यांनी टाळाटाळ केल्याने स्वच्छेने इतर कामगारांना मदतीसाठी घेतल्याचे गायकवाड यांनी पत्रकाराना सांगितले.
दरम्यान, ठराविक समाजाचे बॅनर फाडल्याप्रकरणी उप मुख्याधिकाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात यावी, यासाठी पाचपावली देवी मंदिराजवळ रास्ता रोको करून त्यानंतर पोलिस स्टेशनला मोर्चा काढला होता.