दहावी निकालाची वेबसाईट क्रॅश ; हजारो विद्यार्थ्यांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:32+5:302021-07-17T04:14:32+5:30
जळगाव : दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता घोषित करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी दिलेले दोन्ही संकेतस्थळ क्रॅश झाले ...
जळगाव : दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता घोषित करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी दिलेले दोन्ही संकेतस्थळ क्रॅश झाले आणि जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. निकाल लागला असताना तो विद्यार्थ्यांना पाहता येत नसल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. एकाच वेळी ही संकेतस्थळे पाहिली जात असल्याने सर्व्हर डाऊन होऊन 'सर्व्हिस अनअव्हेलेबल' असा संदेश येऊ लागला. सायंकाळी उशिरापर्यंत हा घोळ सुरू होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चांगलेच हैराण झाले होते.
विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल मंडळाकडून सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला होता. दुपारी १ वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार होता़ त्यामुळे निकाल जाहीर होण्याच्या पंधरा मिनिट आधीपासून विद्यार्थ्यांनी मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ ओपन करून ठेवले होते. विद्यार्थांनी निकालाच्या साईटवर गर्दी केल्याने साइट क्रॅश झाली. सायंकाळ होऊनसुध्दा ऑनलाइन निकाल विद्यार्थ्यांना पाहता आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक त्रस्त झाले होते.
अधून-मधून संकेतस्थळ सुरू
दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल पाच तासांहून अधिक वेळ झाला तरी डाऊनच होती. त्यामुळे निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागले होते. दुपारी अधून-मधून दोन्ही संकेतस्थळ सुरू होत होती. सायंकाळी साडेसहा वाजेनंतर संकेतस्थळ सुरू झाले होते. मात्र, ते संथ गतीने सुरू होते.
वैतागून शिक्षकही परतले...
शाळेचा निकाल किती टक्के लागला, किती विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले यासाठी सकाळपासून शिक्षकांसह मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळांमध्ये हजेरी लावली होती. निकाल जाहीर होण्याच्या अर्धा तासाआधी शिक्षकांनी संकेतस्थळ सुरू केले होते. पण, सायंकाळचे सहा वाजले तरी वेबसाईट डाउन असल्यामुळे शिक्षकांनासुध्दा निकाल पाहता आला नाही. अखेर वैतागून सायंकाळी शिक्षक व मुख्याध्यापक घरी परतले होते.
विद्यार्थी मोबाइल, लॅपटॉपसमोर बसून
रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक निकालाची प्रतीक्षा करीत होते. मोबाइल, लॅपटॉप, संगणकासमोर बसून होते़ मात्र, काही विद्यार्थ्यांसह शाळांना आपला निकाल पाहता आला़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले व्हॉट्सअॅप स्टेट्स अपडेट केले होते. तर पालकांनी आपल्या पाल्यांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला.