मित्राकडे वह्या, पुस्तके घ्यायला गेलेला दहावीचा विद्यार्थी दुचाकी अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:30 PM2019-10-11T12:30:56+5:302019-10-11T12:31:23+5:30
रस्त्याने पायी चालणाऱ्या ट्रकच्या क्लिनरला दिली दुचाकीची धडक
जळगाव : मित्राकडे वह्या, पुस्तके घेण्याचे नाव करुन घराबाहेर पडलेला संकेत ज्ञानेश्वर तायडे (१६, रा.हनुमान नगर, अयोध्या नगर, जळगाव, मुळ रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर) या विद्यार्थ्याचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे नऊ वाजता अजिंठा चौकापासून नजीक असलेल्या ट्रान्सपोर्ट नगरासमोर घडली.
संकेत याने पादचारी गुणवंतभाई दयाराम जोशी (४०, रा. गांधी नगर, केसोद, जि.जुनागड, गुजरात) या ट्रक क्लिनरला जोरदार धडक दिली. त्यात जोशीही गंभीर जखमी झाले आहेत. संकेत हा सेंट टेरेसा शाळेचा विद्यार्थी असून दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा बुधवारी रात्री दुचाकीने (क्र. एम.एच.१९ डी.के.८५२४) मित्राकडे वह्या व पुस्तके घेण्यासाठी गेला होता. बराच वेळ झाला तरी मुलगा घरी आला नाही म्हणून वडील ज्ञानेश्वर दयाराम तायडे यांनी संकेत याला फोन केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या मित्राला फोन करुन चौकशी केली असता तो पुस्तके घेऊन केव्हाचाच गेला अशी माहिती मिळाली. रात्रीचे १२ वाजले तरी मुलाची माहिती मिळत नसल्याने ज्ञानेश्वर तायडे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. तेथे गेल्यावर संकेतची अपघातग्रस्त दुचाकी आढळली. तायडे यांनी त्याबाबत चौकशी केल्यावर मुलाचा अपघात झाल्याची माहिती मिळाली.
तेथून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जिल्हा रुग्णालय गाठले असता संकेत रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. मात्र संकेत हा जग सोडून गेला होता. या घटनेचा तायडे यांना जबर धक्का बसला. नातेवाईक व पोलिसांनी त्यांना सावरले.
डोक्याला मार लागल्याने जागेवरच मृत्यू
संकेत हा दुचाकीने जात असताना रस्त्याने पायी जात असलेले गुणवंतभाई दयाराम जोशी यांना धडक दिली, त्यात जोशी व संकेत असे दोघंही रस्त्यावर पडले.संकेत याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील लोकांनी रिक्षात टाकून संकेत व जोशी यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हवालदार रतिलाल पवार यांनी रुग्णालयात धाव घेऊन दुचाकीच्या क्रमांकावरुन संकेतची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी ट्रक चालक इसाभाई उस्मानभाई दल यांच्या फिर्यादीवरुन मृत संकेत तायडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत: च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे कलम या गुन्ह्यात लावण्यात आले आहे.तपास सहायक निरीक्षक संदीप हजारे करीत आहे.
ट्रकचा क्लिनर जेवणाला जात असताना अपघात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक इसाभाई उस्मानभाई दल (५५) व क्लिनर गुणवंतभाई दयाराम जोशी मंगरोल, गुजरात येथून ओले नारळ घेऊन बुधवारी रात्री जळगावात आले होते. इद्रीसभाई जलगाववाले यांच्याकडे नारळ खाली करुन ट्रक घेऊन ते ट्रान्सपोर्ट नगरात आले. चालक तेथेच थांबला तर त्यांनी गुणवंतभाई यांना शंभर रुपये देऊन बाहेर जेवणाला पाठविले होते. ते जेवणाला जात असतानाच हा अपघात झाला.
एकुलता मुलगा गेल्याने आई, वडीलांचा प्रचंड आक्रोश; शाळेतील शिक्षक व विद्यार्थी हळहळले
संकेत तायडे याचे वडील ज्ञानेश्वर दयाराम तायडे यांचे एमआयडीसीत व्ही.सेक्टरमधील प्लॉट क्र.६४ मध्ये सागर इंडस्ट्रीज इंजिनियरींग वर्कशॉप आहे. त्यांचे मुळ गाव चांगदेव, ता.मुक्ताईनगर आहे. आई वैशाली गृहीणी असून बहीण देवयानी सेंट टेरेसा कॉन्वेट इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. संकेत हा एकुलता मुलगा होता. अभ्यास प्रचंड हुशार व मनमिळावू स्वभावाचा होता. गुरुवारी सकाळी नेरी नाका येथील वैकुंठधाम येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अपघाती मृत्यूने आई वैशाली व वडील ज्ञानेश्वर तायडे यांना मोठा धक्का बसला असून दोघांनी प्रचंड आक्रोश केला.
बुधवारी रात्री झालेल्या अपघातात शाळेतील चांगला विद्यार्थी संकेत तायडे याचा मृत्यू झाला़ ही घटना सर्वांना चटका लावून गेली असून कुटुंबातील एक सदस्य आपल्यातून निघून गेला म्हणून त्यास श्रध्दांजली वाहण्यासाठी गुरुवारी शाळेला सुटी जाहीर करण्यात आली होती़ तर पालकांनी आपल्या पाल्यांना वाहने देऊ नये, तसेच शाळेत वाहने न आणण्याच्याही सूचना केल्या आहेत़ शाळा प्रशासन याबाबत गंभीर आहे
- ज्युलिएट अब्राहम, मुख्याध्यापक, सेंट टेरेसा स्कूल