गावांमध्येही वाढली ‘कोरोना’ ची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 08:50 PM2020-03-25T20:50:51+5:302020-03-25T20:51:07+5:30
बाहेरगावाहून येणाऱ्यांना प्रवेश बंद : चौकशी करूनच प्रवेश, आव्हाणे, कठोरा, नांदगावसह अनेक गावांमध्ये नाकाबंदी
जळगाव : शहराप्रमाणे आता ‘कोरोना ची दहशत गावांमध्येदेखील पसरत जात आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये बाहेरगावाहन येणाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. एखादा व्यक्ती गावाचाच रहिवासी आहे. मात्र, अनेक दिवसांपासून बाहेर गावाला वास्तव्याला आहे. अशा नागरिकांनाही आधी जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्याचे प्रमाणपत्राशिवाय प्रवेश दिला जात आहे.
महाराष्टÑात लॉक डाऊन झाल्यानंतरही ग्रामीण भागात ‘कोरोना’ बाबत नागरिक फारसे गांभिर्याने घेत नव्हते. मात्र, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर ग्रामीण भागातही आता ‘कोरोना’ ची दहशत पसरली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, सामाजिक संस्था व युवकांनीच आता गावात येणा-यांबाबत खबरदारी घेतली आहे.
मंदिर, सप्ताह, यात्रा, लग्न समारंभ, साखरपुड्याचे कार्यक्रमही रद्द
अनेक गावांमध्ये मार्च महिन्याचा शेवटच्या आठवड्यात हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कारोनामुळे अनेक दशकांची परंपरा असलेले सप्ताह देखील ग्रामस्थांनी रद्द केले आहेत. यासह धरणगाव तालुक्यातील आव्हाणी या गावाने पुढील आठवड्यात भरणारी यात्रा देखील रद्द केली आहे. यासह लग्न समारंभ, साखरपुड्याचे कार्यक्रम रद्द करून, नवीन मुहूर्त शोधला जात आहे.तर अनेकांकडे घरातल्या घरात छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन करून, कार्यक्रम पार पाडले जात आहेत.
मुंबई-पुण्याहून येणाºयांचा ओघ सुरुच
संपुर्ण देशात लॉक डाऊन आहे. यासह जिल्हा बंदी देखील करण्यात आली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही मुंबई-पुण्याहून आपल्या मुळगावी येणाºयांची संख्या मोठी आहे. रात्री-बेरात्री मिळेल त्या वाहनाने प्रवेश करून अनेक नागरिक गावांकडे येत आहे. प्रशासनाने कितीही खबरदारी घेतली तरी प्रशासनाला अंधारात ठेवून अनेक नागरिक गावांकडे येत आहे. त्यामुळेच आता गावांमध्येहीअशा नागरिकांना येण्यास बंदी करण्यात आली आहे. तसेच काही नागरिकांना जिल्हा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर जिल्हा परिषदेची शाळा, खासगी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात१४ दिवसांसाठी वेगळे ठेवले जात आहे.
‘कोरोना’मुळे आता लॉक डाऊन असल्याने संपुर्ण देशातील कारभार ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत रब्बीचा हंगाम काढणीवर आला असतानाही, शेतकºयांना शेतांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे गहू, हरभरा काढणीसह केळीला पाणी देण्याचेही काम रखडली आहेत. गहू काढणीसाठी यंत्र मिळत नसल्याने जुन्या पध्दतीने गहू कापून तो काढला जात आहे.