कुटुंबातील एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली तरी संपूर्ण कुटुंबाची चाचणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:17 AM2021-04-08T04:17:00+5:302021-04-08T04:17:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : घरातील एक व्यक्ती जरी कोरोना पॉझिटिव्ह आढळली तरी त्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींची कोरोना चाचणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : घरातील एक व्यक्ती जरी कोरोना पॉझिटिव्ह आढळली तरी त्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात यावी, असे निर्देश महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बुधवारी मनपा वैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले.
महापौर दालनात बुधवारी सायंकाळी कोरोना उपाययोजनांबाबतची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत शहरातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, प्रभाग अधिकारी इतर कर्मचारी उपस्थित होते.
६० वर्षांवरील रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होत असलेल्या मृत्यूचे एक मुख्य कारण म्हणजे कोरोनासारखा आजार नागरिक अंगावर काढतात. यामुळे शहरातील वयाने साठ वर्षाहून अधिक असलेले नागरिक जर कोरोना पॉझिटिव्ह आले तर त्यांना गृहविलगीकरणामध्ये न ठेवता त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेणे. जेणेकरून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार होतील आणि ते बरे होतील, अशी सूचना यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केली.
घाबरू नका, आम्ही डॉक्टरांच्या पाठीशी
गृहविलगीकरणाबद्दल रुग्णांचे नातेवाईक बऱ्याचदा गृहविलगीकरण करण्यासाठी आमच्यावर दबाव टाकतात, अशी तक्रार एका डॉक्टरने केली. यावेळेस महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचं कर्तव्य बजवा, असे सांगितले.
संपूर्ण कुटुंबाची तपासणी करा
एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आल्या-आल्या त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचीसुद्धा टेस्ट करण्यात यावी. जास्तीत जास्त टेस्ट होतील आणि कोरोनावर अंकुश ठेवण्यात महापालिकेला यश मिळेल, असे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले. शहरातील काही डॉक्टर आहेत जे होम आयसोलेशनचा फॉर्म भरून देत आहेत. त्यामुळे त्या डॉक्टर्सवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी काही डॉक्टरांनी केली. यावेळी महापौरांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला, त्याचबरोबर काही नागरिकांकडून तक्रार आली होती की, ज्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण सापडला त्या घरात वेळेवर जंतुरोधक फवारणी होत नाही. यामुळे लवकरात लवकर ही फवारणी करायला हवी, असे आदेश यावेळी महापौरांनी दिले.