साकेगाव हाणामारीप्रकरणी गावात शांततेची दिली ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:13 AM2021-06-17T04:13:08+5:302021-06-17T04:13:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारीची घटना १३ रोजी रात्री झाली, यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारीची घटना १३ रोजी रात्री झाली, यात दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दोन्ही गटातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक १५ रोजी बोलावली होती. या दोन्ही गटाकडून गावात शांततेची ग्वाही देण्यात आली.
साकेगावात तब्बल ३३ जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात, मात्र एखादी दुर्दैवी घटना घडल्यास गावात तणाव निर्माण होतो. क्षणिक संतापाच्या भरात भविष्याचे नुकसान होऊन जाते हे जर घटनेच्या वेळीच लक्षात ठेवले तर असा प्रसंग कधीच उद्भवणार नाही. जे लोक हाणामाऱ्यांसाठी इतरांना प्रवृत्त करतात, पण ते कधीच कृतीमध्ये सामील होत नाही, लांबूनच भांडणांचा आनंद घेत असतात अशांच्या नादी लागू नका. अप्रिय घटनेनंतर कोर्टकचेऱ्या, पोलीस ठाण्याच्या चकरा याशिवाय दवाखान्यात लागणारा खर्च, मानसिक तणाव तसेच समाजात बदनामी होते याचे सर्वांनी भान ठेवावे. एखादेवेळेस वादाचा विषय निघाला तर तो सामोपचाराने मिटवून घ्यावा, असे शांतता कमिटीच्या बैठकीत तालुका पोलीस ठाणे ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दोन्ही गटातील प्रतिष्ठित नागरिकांना उद्देशून सांगितले.
सोशल मीडियावर अफवा पसरवू नका, पोलिसांची राहणार करडी नजर
अनेक भांडण-तंटे गैरसमज हे सोशल मीडियाद्वारे पसरत असतात. कोणीही चुकीची माहिती सोशल मीडियावर टाकू नका, चुकीचे व्हिडिओ व्हायरल करू नका. आपल्या एका चुकीमुळे गावात वाद निर्माण होऊ शकतो. यामुळे सोशल मीडियाचा वापर चांगल्या कार्यासाठी करा. एखाद्याने वाद वाढविण्याच्या इराद्याने काही पोस्ट टाकली तर त्याची गय केली जाणार नाही, अशी तंबीही या वेळी कुंभार यांनी दिली.
याप्रसंगी जि.प. सदस्य रवींद्र पाटील, प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, याशिवाय ग्रामपंचायत सदस्य, दोन्ही समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीस उपस्थित होते.