प्रयोगशाळेकडून १२०० नमुन्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:41 AM2020-06-02T11:41:17+5:302020-06-02T11:41:28+5:30
वेग वाढला : खासगी लॅबमध्ये २०० नमुने पाठविले
जळगाव : कोरोना रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत या ठिकाणी १२०० नमुने तपासण्यात आले आहे़ लवकरात लवकर अहवाल देण्याचा प्रयत्न प्रयोगशाळेकडून होत असून भार वाढल्यास खासगी लॅबकडेही नमुने पाठविण्यात येत आहेत़
अहवाल मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहत असल्याने जळगावातील प्रयोगशाळेच्या कामाला गती देण्यात आली होती़ मंजूरीनंतर महिनाभरात मशिनरी व सर्व साहित्य उपलब्ध होऊन प्रयोगशाळा सुरू करण्यात आली़ या ठिकीणी डॉक्टर्स, तंत्रज्ञ व सहाय्यक अशी १२ जणांची टीम असून तीन शिफ्टमध्ये ही लॅब सद्यस्थितीला सुरू आहे़ दरम्यान, काही दिवसात सर्व प्रलंबीत अहवाल मार्गी लागून रूग्णाचे नमुने घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अहवाल मिळतील असे नियोजन सुरू आहे़
दरम्यान, जिल्ह्यातील धुळे येथील जवळच्या भागांतील काही नमुने धुळे प्रयोगशाळेतही पाठविले जात असल्याचे समजते़ तपासणी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने नमुने संकलनही वाढले आहे़ त्यादृष्टीने शासनाकडून खासगी लॅबसोबत करार केला असून खासगीतही काही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे़ त्या शुक्रवारी २९ मे रोजी २०० नमुने खासगीत पाठविण्यात आले होते़
दहा मशिनरी महत्त्वाच्या
प्रयोगशाळेत छोट्या-मोठ्या अनेक महत्त्वाच्या मशिनरी असून यात बायोसेफ्टी कॅबिनेट, ए टू ए थ्री लेव्हल, व्होरटेक्स मिक्सर, कोल्ड सेन्ट्रीफ्युजन, लॅमिनर फलो, पीसीआर वर्कस्टेशन, आरटीपीसीआर मशिन, मिनी सेन्ट्रीफयुजन, सीबी नॅट, मायनस २० डिग्री फ्रिज, मायनस ८० डिग्री फ्रिज या काही मशिनरी या प्रयोगशाळेत आहेत़ यासह अन्य काही छोट्या मशिन्सही उपलब्ध आहेत़ दहा दिवसांचे किट व अन्य साहित्य उपलब्ध असून पुढील दहा दिवसांचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़