बनावट दारुचा चालता-फिरता कारखाना, सातपुडय़ात मुख्य केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:07 PM2018-01-23T13:07:56+5:302018-01-23T13:09:31+5:30
शिरपूर व पारोळ्यातून हलतात सूत्रे
सुनील पाटील / ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 23- जळगाव व मध्यप्रदेश जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या सातपुडय़ात दारु माफियांनी चालते-फिरते कारखाने सुरु केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन वेळा हे कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईवरुन हे माफिया पुन्हा सक्रीय झाल्याचे सिध्द झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बनावट दारुच्या रॅकेटचे सूत्रे शिरपूर व पारोळा येथून हलतात. या दोन्ही शहर व तालुक्यातील दारु माफिया वारंवार रडारवर आलेले आहेत. चोपडा तालुक्यात वैजापूर शिवारात आयशर ट्रक व ट्रॅक्टर असे वाहने नेण्यात येतात. त्यात रिकाम्या दारुच्या बाटल्या, रसायन, स्पीरीट, विविध कंपन्यांचे लेबल, पॅकिंग मशिन असे साहित्य याच वाहनात नेण्यात येते. नदीकाठी किंवा विहिरीच्या शेजारी रात्री व दिवसा या वाहनात दारु निर्मिती केली जाते. विशेष म्हणजे या माफियांकडून प्रत्येक वेळी निर्मितीचे ठिकाण बदलविण्यात येते.
वैजापूर शिवारात तयार केली दारु?
दारु बंदी असलेल्या वर्धा व चंद्रपूर या दोन जिल्ह्यात जळगाव व धुळे जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात बनावट दारु पाठविली जाते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपुरला जाणारी 18 लाख रुपये किमतीची बनावट देशी दारु पकडल्यानंतर राजेंद्र सुरेश खारकर (वय 26, रा. वांजळी, ता.वणी जि.यवतमाळ), शीतल सुखदेव ब्राrाणे (वय 38, रा. बल्लारशा, जि.चंद्रपुर) व ट्रक मालक धनराज उरकुडा चापले (वय 38 रा.वरोरा, चंद्रपुर) या तिघांना अटक करण्यात आली. या तिघांना माफियाने चोपडय़ात थांबवून चार तासांनी दारुने भरलेला ट्रक त्यांच्या ताब्यात दिला.
शिरपूर किंवा वैजापूर शिवारातून ट्रकमध्ये दारु भरण्यात आली असावी अशी शक्यता अधिका:यांनी वर्तविली आहे.ही दारु नगर व नाशिक जिल्ह्यातील नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संशयितांवर कलम वाढविण्यात आले.
गेल्या आठवडय़ातही राज्य उत्पादन शुल्क विभागाने पनवेल येथे जाणारी 18 लाखाची दारु पकडली. ही दारुदेखील चोपडा येथूनच आली होती.
पारोळ्याच्या दारु माफियावर तीन वेळा कारवाई
दोन महिन्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पोलिसांनी बनावट दारुचा ट्रक पकडला होता. त्यात पारोळा येथील समाधान चौधरी याचे नाव पुढे आले होते. पोलिसांनी लाखो रुपयाच्या दारु साठय़ासह ट्रक जप्त करुन चौधरीला अटक केली होती. तर याआधीही पारोळा तालुक्यातील उतड्र शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल 2016 मध्ये बनावट दारु निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करुन चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. हा कारखाना याच चौधरीचा असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हाही त्याला अटक झाली होती. ही कारवाई ताजी असताना नाशिक येथील भरारी पथकानेही चौधरीचा दारु साठा पकडला होता. आता देखील त्याच्याकडेच संशयाची सुई जात असल्याची माहिती एका अधिका:याने दिली.
ऑर्डरनुसार तयार केली जाते दारु
जळगाव, धुळे, नंदूरबार या तीन जिल्ह्यातील रस्त्यांना लागून असलेले ढाबे तसेच चंद्रपुर व वर्धा जिल्ह्यात चार चाकी वाहनातून दारु पोहच केली जाते. दरम्यान, बाटल्यांची पॅकिंग झाल्यानंतर याच वाहनातून दारु गोपनीय ठिकाणी हलविली जाते. पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती कार्यरत असतो. शिरपुर व पारोळा येथील दोन माफिया यात सक्रीय असल्याची माहिती सूत्रांनी दिली.