जळगावात कापड व्यावसायिकांनी सणांचे बुकींग थांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:50 PM2017-08-02T12:50:30+5:302017-08-02T12:52:34+5:30
दुहेरी संकट : जीएसटी पाठोपाठ गाळे जप्तीची टांगती तलवार
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 2 - वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर आता शहरातील व्यापारी संकुलांमधील गाळे जप्तीची टांगती तलवार असल्याने जळगावातील कापड व्यवसायावर संकट ओढावले असून व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. दोन महिन्यांवर दसरा, दिवाळी सण आहे. या संभ्रमावस्थेमुळे मालाची आगाऊ नोंदणी करण्यास कापड व्यावसायिक धजावत नसल्याचे चित्र आहे. या वृत्तास काही कापड व्यावसायिकांनी दुजोरा दिला आहे.
वस्तू व सेवा कर लागू होण्यापूर्वी केवळ रेडिमेड कापडांवरच कर लागत असे. मात्र आता 1 जुलैपासून शुटींग, शर्टीग, कापड यावरही 5 टक्के जीएसटी लागत असल्याने कापड व्यावसायिकांना याचा फटका बसला.
जळगावात कापड व्यवसायाची मोठी बाजारपेठ आहे. येथून जळगाव जिल्ह्यासह मराठवाडा व विदर्भ या भागातही माल जातो. इतकेच नव्हे लग्नसराई व सणासुदीच्या काळात येथे खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे शहरात कापड व्यवसायाने मोठे प्रस्थ निर्माण केले आहे. मात्र गाळे जप्तीच्या आदेशामुळे कापडाच्या या मोठय़ा बाजारपेठेस मोठा हादरा बसला आहे.
गाळे प्रश्नी जो र्पयत तोडगा निघत नाही तोर्पयत मालाची खरेदी न करण्याच्या विचारात अनेक व्यावसायिक आहेत. इतकेच नव्हे सध्यादेखील अनेक व्यावसायिकांनी मालाची खरेदी थांबविली आहे.
जीएसटीचा पुरवठादारांवर परिणाम
जीएसटी लागू झाल्यानंतर कापड निर्मिती व पुरवठादारांकडे काहीसा परिणाम दिसून येत असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे येणा:या काळात मागणी व त्या प्रमाणात पुरवठा होतो की नाही याकडेही लक्ष लागून आहे. मात्र हळूहळू ही स्थिती सुधारेल, असेही व्यावसायिकांचे म्हणण आहे.
सणासुदीच्या दिवसात संभ्रमावस्था
शहरातील उलाढाल पाहता सणासुदीसाठी साधारण दोन महिने अगोदर मालाची आगाऊ नोंदणी करावी लागते. त्यावेळी पुरेसा माल येथे उपलब्ध होतो. मात्र सध्या गाळे जप्तीच्या भीतीमुळे व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था पसरली आहे. गाळे प्रकरणी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे, यासाठी गाळेधारक मोठय़ा आशेने नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन आपल्या व्यथा मांडत आहे. त्यामुळे व्यवसायावरही परिणाम झाला आहे.
गाळे प्रश्नामुळे मनात भीती निर्माण झाली असून दिवाळी, दसरा जवळ येत असला तरी सध्या मालाची बुकिंग थांबविली आहे. जो र्पयत यावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत माल खरेदी करण्याची मानसिकता नाही.
-भरत समदडिया, कापड व्यावसायिक.
मनामध्ये भीती, संभ्रम असला तरी व्यवसाय थांबविता येणार नाही. यावर काही तोडगा निघेल, या आशेने अनेक व्यावसायिक मालाची खरेदी करीत आहे.
-हिरानंद मंधवाणी, अध्यक्ष फुले मार्केट असोसिएशन.