आईच्या भेटीला आलेल्या महिलेची पोत, मंगळसूत्र लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:20 AM2020-12-30T04:20:48+5:302020-12-30T04:20:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील सानेगुरुजी कॉलनीत आईच्या भेटीसाठी आलेल्या ठाणे येथील सुलोचना विश्वासराव पाटील (६५) या महिलेची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील सानेगुरुजी कॉलनीत आईच्या भेटीसाठी आलेल्या ठाणे येथील सुलोचना विश्वासराव पाटील (६५) या महिलेची पायी चालत असताना १ लाख ४४ हजारांची मंगलपोत चोरट्याने हिसकावून पळ काढल्याची घटना २८ रोजी सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
ठाणे येथे सुलोचना पाटील या मुलगा डॉ. योगानंद पाटील, सून डॉ. ललिता पाटील व नातवंडासह वास्तव्यास आहेत. २७ रोजी त्या परिवारासह एरंडोल येथे शेती असल्याने त्या बघण्यासाठी आल्या होत्या. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.२० वाजेच्या सुमारास सुलोचना ह्या जळगाव शहरातील सानेगुरुजी कॉलनी येथे राहत असलेल्या त्याच्या आई निलावंती कृष्णा पाटील यांना भेटण्यासाठी आल्या. यावेळी चारचाकीतून उतरल्यानंतर त्यांचा मुलगा हा गावात निघून गेला. यावेळी सुलोचना या सानेगुरुजी गार्डन जवळून जात असताना त्याच्या पाठीमागून अंदाजे ३० ते ३५ वर्षाचा चोरटा आला. त्याने सुलोचना यांच्या गळ्यातील ९६ हजार रुपयांची दोन तोळ्याची सोन्याची पोत व ४८ हजार रुपयांचे एका तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने तोडून एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लांबविला.
दुचाकीवर बसून चोरटा पसार
पोत व मंगळसूत्र हिसकावल्यानंतर वृध्द महिलेने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटा हा काही अंतरावर उभ्या असलेल्या विनाक्रमांकाच्या दुचाकीवर बसून पसार झाला. हा संपूर्ण प्रसंग एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. सोमवारी सायंकाळी रामानंदनगर पोलिसांनी पाहणी केल्यानंतर मंगळवारी त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, याप्रकरणी सुलोचना पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात सोमवारी रात्रीच गुन्हा दाखल केला आहे.