मराठा आरक्षणाचा विषय बिघडविण्याचे काम ठाकरे सरकारने केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:21 AM2021-06-09T04:21:14+5:302021-06-09T04:21:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सरकारचे मनात देखील नसून, जाणून बुजून ठाकरे सरकार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्याचे सरकारचे मनात देखील नसून, जाणून बुजून ठाकरे सरकार मराठा आरक्षणात घोळ करीत आहे. ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टात तांत्रिक बाजू न मांडल्यामुळे जे मराठा आरक्षण भाजपच्या फडणवीस सरकारने पाच वर्ष टिकविले ते बिघडविण्याचे काम ठाकरे सरकारने केल्याचा आरोप माजी खासदार नीलेश राणे यांनी केला आहे.
सोमवारी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, आमदार मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठाकरे सरकारच्या मनात कधीच नव्हते असे ही नीलेश राणे यांनी सांगितले.
अशोक चव्हाण समितीत असल्याने आरक्षण मिळणारच नव्हते
मराठा समाज आरक्षणाचा घोळ ठाकरे सरकारने केला आहे. ठाकरे सरकारमध्ये या विषयाचा अभ्यास करणारा एकही व्यक्ती नाही. सुप्रिम कोर्टात आवश्यक असलेले संदर्भ, नोंदी सादर केल्याच नसल्यानेच आरक्षण टीकले नाही. अशोक चव्हाण या समितीमध्ये असल्याने आम्हाला खात्री होतीच की आरक्षण टीकणार नाही. मागास आयोग स्थापन करुन मागासलेपणा सिध्द करावा लागेल हेच ठाकरे सरकारला महिन्यापर्यंत माहित नव्हते. केंद्राकडे बोट दाखविले जात असले तरी याबाबी राज्य सरकारने पूर्ण केल्या पाहीजे होत्या. असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंची आरती ओवाळायची का ?
मुख्यमंत्री ठाकरे मुंबईला जाणार आहेत, यावर बोलतांना त्यांची आरती ओवाळायची का ? म्हणत ते घरातून बाहेर निघाले तेच खूप आहेत. असा टोलाही राणे यांनी लगावला. बिनकामाचे संजय राऊत दररोज सकाळी विषय वळविण्याचे काम करतात. मराठा समाजाचा अपमान करण्याचे काम राऊत यांनी केले. मात्र, अद्याप माफी मागितलेली नाही, तो हिशोब आम्ही नंतर करु असा इशाराही राऊत यांनी दिला.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
मराठा समाजाला कुठे जावे ते कळत नाही. हात पसरुन झालेत. आंदोलन करुन झालीत. आता ठाकरे सरकार तीव्र आंदोलनाची वाट पाहात आहेत. एक दिवस मराठा समाज घरात घुसून आपला हक्क घेतील असा इशारा देखील नीलेश राणे यांनी दिला. भाजपाच्या माध्यमातून मराठा समाजाला एकत्र करुन एक तीव्र आंदोलन उभारण्याचे काम सुरु आहे. लवकरच आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचेही राणे यांनी सांगीतले.
संभाजी राजे छत्रपतींनी ठाकरे सरकारला प्रश्न विचारावे
मराठा आरक्षणासंदर्भात संभाजी राजे छत्रपती हे भाजपाचे खासदार आहेत. मात्र, त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत ठरविलेली तारीख ही पक्षाला विचारुन ठरविलेली नाही. त्यामुळे त्यांना पाठींबा द्यावा की नाही, हा निर्णय पक्ष घेईल अशी माहिती राणे यांनी दिली. राज्य सरकारने आतापर्यंत काय केले ? असे प्रश्न राजेंनी ठाकरे सरकारला विचारावे असेही राणे यांनी सांगीतले.
खडसेंना राष्ट्रवादीत करमत नाही
भाजपाकडून आमदार फुटू नये म्हणून सरकार पडेल असे सांगीतले जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केले होते. यावर बोलतांना त्यांना बोलू द्या, तिथे त्यांना करमत नसेल म्हणून असे बोलतात असा टोला नीलेश राणे यांनी लगावला.