बोदवडजवळ प्रेमप्रकरणातून तृतियपंथीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:43 PM2019-07-07T23:43:24+5:302019-07-07T23:46:30+5:30
पत्नी व मुलांना सोडून सोबत रहा, अन्यथा घरी व नातेवाईकांना सांगून बदनामीची धमकी देणाºया चंदा उर्फ कैलास (मुळ रा.नशिराबाद, ह.मु.अडावद, ता.चोपडा) या तृतियपंथीचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता बोदवड तालुक्यातील नाडगाव शिवारातील उजनी दर्गाजवळ घडली.
जळगाव : पत्नी व मुलांना सोडून सोबत रहा, अन्यथा घरी व नातेवाईकांना सांगून बदनामीची धमकी देणा-या चंदा उर्फ कैलास (मुळ रा. नशिराबाद, ह.मु.अडावद, ता.चोपडा) या तृतियपंथीचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता बोदवड तालुक्यातील नाडगाव शिवारातील उजनी दर्गाजवळ घडली.
याप्रकरणी चंदाचा प्रियकर संदीप कैलास साळुंके (३०), त्याचा साथीदार राहूल विष्णू ठाकरे (३२), आकाश जयंत सोनवणे (२०) व अतुल हिरालाल धनगर (२२) सर्व रा.कमळगाव, ता.चोपडा या चौघांना लोकांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या चौघांना अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप साळुंके व तृतियपंथी चंदा यांच्यात तीन वर्षापासून प्रेमप्रकरण होते. संदीप याने पत्नी व मुलांना सोडून आपल्यासोबत रहावे म्हणून चंदाचा आग्रह होता, मात्र ते शक्य नसल्याने चंदाकडून घरी कुटुंबात व नातेवाईकात सांगून बदनामी करण्याची धमकी दिली जात होती. आपले बींग फुटू नये म्हणून संदीप याने रविवारी चंदाला उजनी दर्ग्याच्या दर्शनासाठी जायचे आहे असे सांगून मित्राच्या चारचाकीतून (क्र.एम.एच.१९ बी.जे.९५४२) राहूल, आकाश तसेच अतुल यांना सोबत घेऊन उजनी दर्गा ते सोनोटी रस्त्यावर रेल्वे पुलाजवळ नेऊन चाकूने भोसकून खून केला.
मारु नकाचा आवाज ऐकला अन् चौघे फसले
चंदावर चाकूने वार होत असताना मला मारु नका...असा जोराचा आवाज शेजारी लघुशंका करीत असलेल्या किशोर अशोक अवचारे (रा.सोनोटी, ता.बोदवड) या ट्रक्टर चालकाला आला. काय प्रकार आहे यासाठी पुढे जावून बघण्याचा प्रयत्न करीत असताना रक्ताने भरलेल्या अवस्थेत चौघं जण पळताना दिसले. एकाच्या हातात चाकू होता. अवचारे यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता तु तुझे काम कर..असे म्हणून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना शेजारी बक-या चारणा-या तरुणांच्या मदतीने चौघांना पकडण्यात आले. त्यानंतर जेथे आवाज येत होता तेथे त्यांना नेले असता साडी परिधान केलेली महिला मृतावस्थेत व रक्ताच्या थारोळ्यात दिसली.
चौघांना केली अटक
दरम्यान, घटनेच्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार शरद भालेराव, दीपक पाटील, विनोद पाटील व अरुण पाटील यांचे पथक निंबोल दरोड्याच्या तपासासाठी जात असताना हा प्रकार त्यांना समजला. बोदवडचे निरीक्षक खरे,सहायक फौजदार विजेश पाटील, संजय भोसले व इतरांनी गावक-यांच्या ताब्यातून आरोपींना घेऊन पोलीस ठाण्यात आणले.