कार्यकर्त्याने जाब विचारला, गुलाबराव पाटलांनी माफी मागितली!
By अमित महाबळ | Published: April 14, 2023 07:27 PM2023-04-14T19:27:48+5:302023-04-14T19:28:00+5:30
यावेळी एका कार्यकर्त्याने व्यासपीठासमोरील माईकचा ताबा घेत थेट पालकमंत्र्यांना जाब विचारला.
जळगाव: शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनवेळी किंवा त्यानंतर देखील जळगावमध्ये न आलेल्या पालकमंत्र्यांना एका कार्यकर्त्याने थेट समोर उभा राहून जाब विचारला. त्यावर स्पष्टीकरण देत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना माफी मागावी लागल्याचा प्रकार शुक्रवारी, जळगाव शहरात घडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशनसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ सकाळी अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी एका कार्यकर्त्याने व्यासपीठासमोरील माईकचा ताबा घेत थेट पालकमंत्र्यांना जाब विचारला.
रेडक्रॉस समोरील घटना घडली तेथे तुम्ही आला नाहीत, अशी खंत व्यक्त केली. अधिवेशन होते म्हणून मी येऊ शकलो नाही, अशी समजूत घालण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी केला. मात्र, अधिवेशन झाल्यानंतरही तुम्ही आला नाहीत, असे सांगत कार्यकर्त्याने नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्याच्या भावना समजून घेत तुमची नाराजी असेल, तर मी क्षमा मागतो. माझ्याकडे तीन खाती आहेत. त्यामुळे गुढीपाडव्यालाही घरी आलो नव्हतो. तुमच्या मनातील शंका काढून टाका. बिनधास्त रहा, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.