जळगावातील गाळेधारकांची अतिरिक्त रक्कम होणार समायोजित
By सुनील पाटील | Published: April 20, 2023 06:23 PM2023-04-20T18:23:53+5:302023-04-20T18:26:04+5:30
राज्य शासनाने आता गाळे भाडे रेडीरेकनरच्या ८ टक्क्यांवरून ३ टक्के करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे
जळगाव : ज्या गाळेधारकांनी रेडिरेकनर दराचे ८ टक्के रक्कम महापालिकेला भाडे हरकत कायम ठेवून भरलेली आहे, त्यांची ही रक्कम येणाऱ्या भाड्यात टप्प्याटप्प्याने समायोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भात ६ एप्रिल २०२२ रोजीच शासनाने आदेश काढलेले आहेत. दरम्यान, रेडिरेकनर दराचे ८ टक्के भाडे ३ टक्के करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची अधीसूचना अद्याप निघालेली नाही.
राज्य शासनाने आता गाळे भाडे रेडीरेकनरच्या ८ टक्क्यांवरून ३ टक्के करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मुदत संपलेल्या मार्केटमधील ४७० पेक्षा गाळेधारकांनी ८ टक्क्यांप्रमाणे १०० कोटी रुपये भाडे स्वरुपात मनपाकडे जमा केले आहेत. आता राज्य शासनाने भाडे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. दरमहा २ टक्के शास्ती असल्याने तेव्हा वर्षाला २४ टक्केपर्यंत शास्ती जाणार असल्याने वाढीव भुर्दड बसू नये यासाठी या गाळेधारकांनी मुदतीत भाडे भरले होते. या गाळेधारकांनाही आता दिलासा मिळणार आहे.
शासनाच्या उपसचिव विद्या हम्पय्या यांनी काढलेल्या आदेशात गाळे नूतनीकरण, हस्तांतरण करीत असताना शासन ज्या दराने भाडेपट्टा निश्चितीकरण करण्याबाबत निर्णय घेऊन सुधारित आदेश काढेल, तो मान्य असेल व यामुळे येणारा उर्वरित भाडेपट्टा भरणा त्वरीत करण्यात येईल किंवा अतिरिक्त स्वरुपात वसुली असल्यास ही रक्कम पुढील मागणीपत्रात समायोजित करण्यात येईल, असे नमूद केले आहे. अशा स्वरुपाचे हमीपत्र गाळेधारकांकडून महानगरपालिकेनेही घेण्याचे त्यात नमूद आहे.