शेतकऱ्यांचा संताप! मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटलांचा ताफा रोखला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 03:08 PM2023-10-29T15:08:23+5:302023-10-29T15:09:14+5:30
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड गावात शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा ताफा रोखल्याची घटना घडली होती.
प्रशांत भदाणे
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा ताफा संतप्त शेतकऱ्यांनी रोखला. ही घटना रविवारी सकाळी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड गावात घडली.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड गावात शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा ताफा रोखल्याची घटना घडली होती. दोन्ही मंत्र्यांना संतप्त शेतकऱ्यांनी पीक विम्याची भरपाई आणि अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करावा, या मागणी संदर्भात कडक शब्दात जाब विचारला. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याने मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटलांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. शेतीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारे शिवाजी पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांनी मंत्र्यांचा ताफा रोखला होता. शेतकरी आक्रमक होऊन प्रश्न विचारत असल्याने दोन्ही मंत्र्यांची अडचण झाली होती. दरम्यान, यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटलांनी अरेरावी केल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केलाय. घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याने
पोलिसांनी संतप्त शेतकऱ्यांना बाजूला केलं, तेव्हा दोन्ही मंत्र्यांचा ताफा पुढे मार्गस्थ झाला. या घटनेचं गावातील काही लोकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग केलं.
कार्यक्रमाला जात असताना घडली घटना
मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील हे अमळनेर तालुक्यातील कपिलेश्वर येथे आयोजित भक्त निवास आणि इतर विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जात होते. तेव्हा मारवड गावात ही घटना घडली.